Sat, Jan 19, 2019 03:25होमपेज › Mumbai-Thane-Raigad › महापालिकेची ‘सौंदर्यदृष्टी’ जलवाहिन्यांवर

महापालिकेची ‘सौंदर्यदृष्टी’ जलवाहिन्यांवर

Published On: Feb 05 2018 1:47AM | Last Updated: Feb 05 2018 1:17AMमुंबई : पुढारी वृत्तसेवा

आपल्या अर्थसंकल्पात मुंबई महानगरपालिकेने कलाक्षेत्राला चांगली जागा आणि भरपूर निधी दिला आहे. यातून पाईप्स अ‍ॅज कॅनव्हास या प्रकल्पांतर्गत शहराला पाणीपुरवठा करणार्‍या जलवाहिन्यांवर चित्रकारांना चित्रांसाठी जागा देण्यात येणार आहे.

शहर सौंदर्यीकरणासाठी मुंबई बुक रूट, बॉलिवूड वॉक ऑफ फेम, कोकून ट्रॅक आणि बायोडायव्हर्सिटी रूट अशी विविध आकर्षण केंद्रे निर्माण करण्याचा महापालिकेचा मानस आहे. नवे कलादालन आणि सभागृह उभारण्याचेही महापालिकेने अर्थसंकल्पात प्रस्तावित केले आहे. यात थ्रीडी सभागृह आणि आपत्ती व्यवस्थापन केंद्रात शिक्षण दालनाचाही समावेश आहे, त्यासाठी चार कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. 

दादर येथील संयुक्‍त महाराष्ट्र स्मृतिदालनात व्हर्च्युअल रिअ‍ॅलिटी शोज घेण्यात येणार आहेत. प्रस्तावित वस्त्र संग्रहालयात लाईट अँड साऊंड शो घेण्यात येणार आहे. शहरातील कापड गिरण्या, गिरणी कामगारांचे सांस्कृतिक स्थान यावर हा शो आधारित असणार आहे. हे संग्रहालय इंडिया युनायटेड मिलच्या जागेवर उभे राहणार आहे. मुंबई महागनगरपालिका या परिसरातील पाणीपुरवठा यंत्रणाही सुशोभित करणार आहे. 

वारसास्थळाचे संवर्धनाच्या बाबतीत वाचनालयांचा विकास, प्रदर्शन केंद्र आणि पब्लिक प्लाझा उभारण्यात येणार आहे. यासाठी 300 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. या प्रकल्पासाठी अर्थसंकल्पात 25 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. याशिवाय पर्यटकांना आकर्षित करून घेण्यासाठी आणि पर्यटन व्यवसायात वाढ करण्यासाठी अनेक ठिकाणांचा विकास करण्याचाही मुंबई पालिकेचा मानस आहे. 

वारसास्थळे असलेल्या 12 पाणीपुरवठा बिंदूंचा विकास करण्यासाठी आराखडा तयार करण्यात आला आहे. सध्या फोर्ट परिसरातील वारसास्थळांची दृष्यमानता वाढविण्यासाठी महापालिकेचे प्रयत्न सुरू आहेत.त्यासमोर माहिती फलक लावण्यासाठी 4.8 कोटी रुपयांची तरतूद महापालिकेने अर्थसंकल्पात केली आहे.