Tue, Apr 23, 2019 13:35होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मराठा समाजात असंतोष निर्माण करणार्‍यांवर गुप्‍तचर यंत्रणेचे बारीक लक्ष : चंद्रकांत पाटील

मराठा समाजात असंतोष निर्माण करणार्‍यांवर गुप्‍तचर यंत्रणेचे बारीक लक्ष : चंद्रकांत पाटील

Published On: May 04 2018 6:45PM | Last Updated: May 04 2018 6:49PMमुंबई : प्रतिनिधी

मराठा समाजातील युवकांना शिक्षण आणि रोजगार उपलब्ध व्हावा, यासाठी सरकारकडून विविध योजना राबवण्यात येत आहेत. तरीदेखील मराठा समाजात असंतोष निर्माण करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न काही जणांकडून सुरू आहे. या मागे नेमक कोण, त्यांना उचकावण्याचा कोण प्रयत्न करतेय, यावर गुप्तचर यंत्रणेचे बारीक लक्ष आहे. त्यामुळे अशा लोकांना आर्थिक रसद पुरविणार्‍यांनो आपण जे काही करत आहात, ते सांभाळून करा, असा इशारा महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मुंबईत पत्रकार परिषदेत बोलताना दिला.

मराठा समाजाच्या मागण्यांवर राज्य सरकारकडून जी सकारात्मक पावले उचलली जात आहेत, त्यावर मराठा समाजातील जनता समाधानी आहे. मात्र, काही नेते आगामी वर्षातील निवडणूक डोळ्यासमोर ठेवून जाणीवपूर्वक मराठा समाजातील लोकांत संभ्रम निर्माण करून राज्यातील वातावरण बिघडविण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यासाठी काही संघटनांना पुढे केले जात असून, त्यांना त्यासाठी आर्थिक रसदही पुरविण्यात येत आहे. या संघटना व नेत्यांवर गुप्तचर यंत्रणेचे लक्ष असून, त्यांचे चेहरे सर्वांसमोर आणले जातील.

मराठा आरक्षणाचा निर्णय होईल तेव्हा होईल; पण तोपर्यंत शिक्षण, व्यवसाय यासाठी विविध सवलती राज्य सरकारकडून मराठा समाजाला देण्यात येत आहेत. यासाठी काढण्यात आलेले शासन निर्णय काही उपयोगाचे नाहीत, असे सांगत काही संघटना  पत्रकार परिषद घेऊन ते फाडून टाकतात. या लोकांना यशवंतराव चव्हाण सेंटरसारख्या ठिकाणी बैठक व पत्रकार परिषद घेण्यासाठी आर्थिक रसद कुणाकडून पुरविली जात आहे. त्यांचा बोलविता धनी कोण, याचा विचार केला पाहिजे. मांजर जरी डोळे झाकून चोरून दूध पीत असेल आणि त्याला वाटत असेल की आपल्याला कुणी पहात नाही, अशा भ्रमात कुणी राहू नये, असा इशारा चंद्रकांत पाटील यांनी कुणाचे नाव न घेता दिला.

निवडणुकांवर डोळा ठेवून विनाकारण असंतोषाचे वातावरण निर्माण करण्यापेक्षा मराठा समाजासाठी सरकारने राबविलेल्या विविध योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी मराठा संघटना व नेत्यांनी प्रयत्न करावेत. मराठा समाजातील व्यक्‍तीवर कुठे अन्याय होत असेल, तर सरकारच्या ते निदर्शनास आणून द्यावे, असे त्यांनी सांगितले.

Tags : Be careful, those who create, dissatisfaction, chandrakant patil,