Mon, Jul 15, 2019 23:41होमपेज › Mumbai-Thane-Raigad › सावधान! सोशल मीडियावरून महिलांची बदनामी करताय?

सावधान! सोशल मीडियावरून महिलांची बदनामी करताय?

Published On: Feb 06 2018 2:49PM | Last Updated: Feb 06 2018 2:49PMमुंबई : प्रतिनिधी

सामाजिक माध्यमांतून (सोशल मीडिया) महिलांच्या विरोधात केल्या जाणार्‍या अवमानकारक, मानहानीकारक आणि अश्लील कृती अथवा टिप्पणी आता चांगलीच महागात पडू शकते. अशा प्रकारांना रोखण्यासाठी महाराष्ट्र राज्य महिला आयोग हा राज्य सरकारला लवकरच उपयुक्त सूचनांचा समावेश असणारा अहवाल सादर करणार आहे. याबाबत आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी माहिती दिली आहे.

विजया रहाटकर यांनी राज्याच्या महिला व बालविकास आणि ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्याशी केलेल्या चर्चेनंतर ही माहिती दिली. आयोगाच्या अहवालाचा राज्य सरकार गांभीर्याने विचार करेल आणि त्याच्या अंमलबजावणीसाठी प्रयत्न करण्याची हमी यावेळी पंकजा मुंडे यांनी दिली.  

'सामाजिक माध्यमांद्वारे महिलांना त्रास देण्याचे, त्यांच्या मनास लज्जा उत्पन्न होईल अशाप्रकारची अवमानकारक वक्तव्ये आणि टिप्पणी करण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. नोकरदार महिला, खासगी क्षेत्रात काम करणार्‍या  महिला आणि अगदी महिला लोकप्रतिनिधी यांच्याकडूनही यासंदर्भात महिला आयोगाला सातत्याने तक्रारी येत आहेत. अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी योग्य पावले उचलण्याची नितांत गरज निर्माण झाल्याचे आयोगाला वाटते. कारण अशाप्रकारच्या जाहीर अवमानकारक टिप्पणीचा त्या महिलेच्या मानसिकतेवर विपरीत परिणाम होण्याची भीती असते. म्हणून तज्ज्ञ व्यक्तींचा समावेश असलेल्या समितीकडून यासंदर्भात अभ्यासपूर्ण अहवाल तयार करून तो राज्य सरकारला शक्य तितक्या लवकर सुपूर्द केला जाईल,' असे रहाटकर यांनी सांगितले.