Sun, Mar 24, 2019 04:13होमपेज › Mumbai-Thane-Raigad › 6 वर्षांच्या मुलीवर बसचालकाचा लैंगिक अत्याचार

6 वर्षांच्या मुलीवर बसचालकाचा लैंगिक अत्याचार

Published On: Jun 16 2018 1:30AM | Last Updated: Jun 16 2018 1:06AMमुंबई : प्रतिनिधी

शिर्डीहून एका खाजगी बसमधून मुंबईच्या दिशेने येताना बाजूच्या सीटवर बसलेल्या एकाने सहा वर्षांच्या मुलीचा बसमध्येच प्रवासादरम्यान लैगिंक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी कुरार पोलिसांत गुन्हा दाखल होताच पळून गेलेल्या आरोपीस शुक्रवारी गुन्हे शाखेच्या अधिकार्‍यांनी अटक केली. सोपान निवृत्ती उगले (32) असे या आरोपीचे नाव असून तो बेस्टचा कर्मचारी आहे. सध्या त्याची नेमणूक गोरेगाव बस डेपोमध्ये चालक म्हणून होती. दरम्यान, अटकेनंतर त्याला पुढील चौकशीसाठी कुरार पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. 

तक्रारदार महिला तिच्या कुटुंबियांसोबत मालाड परिसरात राहते. सहा वर्षांची पिडीत ही तिची मुलगी असून तीन दिवसांपूर्वीच ते सर्वजण शिर्डी येथे साईबाबांचे दर्शन घेण्यासाठी गेले होते. 13 जूनला संपूर्ण कुटुंबिय शिर्डी-मुंबई या खाजगी बसने मुंबईला येण्यासाठी निघाले होते. सकाळी सहा वाजता ते मालाड येथील त्यांच्या घरी पोहचले. यावेळी सहा वर्षांच्या मुलीने तिच्यावर बाजूलाच बसलेल्या एका अज्ञात व्यक्तीने लैगिंक अत्याचार केल्याचे सांगितले. ही माहिती ऐकून तिच्या आईला प्रचंड मानसिक धक्का बसला. या घटनेनंतर त्यांनी कुरार पोलीस ठाण्यात धाव घेऊन तिथे अज्ञात व्यक्तीविरुद्ध तक्रार केली. याप्रकरणी लैगिंक अत्याचारासह पोस्कोच्या विविध कलमांतर्गत गुन्हा नोंद होताच कुरार पोलिसांनी पळून गेलेल्या आरोपीचा शोध सुरु केला. या गुन्ह्याचा गुन्हे शाखेचे अधिकारीही संमातर तपास करीत होते. 

पोलीस उपायुक्त निसार तांबोळी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी निरीक्षक सुनील जाधव व त्यांच्या पथकातील सचिन गवस, विक्रमसिंह कदम, अतुल आव्हाड, विजय कदम, मंगेश तावडे, दीपक वारे, संतोष गायकवाड, सचिन सावंत, भोसले यांनी त्या खाजगी बसची माहिती काढून सर्व प्रवाशांची माहिती घेणे सुरु केले. तपासात संगमनेर येथे रात्री साडेबारा वाजता एक प्रवासी बसमध्ये चढला होता. तो पिडीत मुलीच्या मागच्या सीटवर बसला होता. रात्री बसण्याची व्यवस्था होत नसल्याने तसेच या व्यक्तीच्या बाजूची सीट खाली असल्याने तक्रारदार महिलेने या मुलीला त्याच्या बाजूच्या सीटवर बसविले होते. यावेळी अंधाराचा फायदा घेत त्याने या मुलीवर लैगिंक अत्याचार केल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले होते. त्यानंतर तांत्रिक माहितीवरुन या पथकाने गोरेगाव येथून सोपान उगले याला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. चौकशीत त्यानेच हा गुन्हा केल्याचे उघडकीस आल्यानंतर त्याला पोलिसांनी अटक केली.

सोपान हा बेस्ट कर्मचारी असून सध्या गोरेगाव बस डेपोमध्ये चालक म्हणून कामाला आहे. तो मूळचा संगमनेरचा रहिवासी आहे. पत्नीशी सतत होणार्‍या भांडणानंतर त्यांनी वेगळे राहण्याचा निर्णय घेतला होता. त्याची पत्नी सध्या माहेरी राहते, तर तो सुट्टीनंतर कामावर हजर राहण्यासाठी 13 जूनला मुंबईत येण्यासाठी निघाला होता. बसमध्येच पिडीत मुलीला एकटीला पाहून त्याने तिच्यावर लैगिंक अत्याचार केला, त्यानंतर तो पळून गेला. मात्र कुठलाही पुरावा नसताना त्याला युनिट बाराच्या अधिकार्‍यांनी शिताफीने अटक केली. अटकेनंतर त्याला शनिवारी विशेष सेशन कोर्टात हजर केले जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.