Mon, Apr 22, 2019 11:43होमपेज › Mumbai-Thane-Raigad › बार, हॉटेल्सना सहकार्यामागे अर्थकारण

बार, हॉटेल्सना सहकार्यामागे अर्थकारण

Published On: Jan 10 2018 1:58AM | Last Updated: Jan 10 2018 1:20AM

बुकमार्क करा
ठाणे : प्रतिनिधी

अग्निशमन विभागाची एनओसी न घेतलेल्या बार, हुक्का पार्लर यांना सर्व प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी 15 दिवसांची मुदत देण्यात आली असली तरी यामागे मोठे अर्थकारण दडले असून ठाणे महापालिकेच्या अधिकार्‍यांना यासाठी बार मालकांनी तब्बल 1 कोटी रुपये दिल्याचा खळबळजनक आरोप मनसेचे जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांनी केला आहे. विशेष म्हणजे केलेला आरोप खोटा निघाल्यास माझ्यावर गुन्हा दाखल करावा, असे आव्हानही जाधव यांनी पालिका प्रशासनाला दिले आहे. याशिवाय अग्निशमन विभागाची एनओसी नसलेल्या बारची यादी जाहीर करण्याची मागणी त्यांनी केली आहे. मनसेच्या आरोपांमुळे बार, हॉटेल्सचा मुद्दा अधिक पेटण्याची चिन्हे निर्माण झाली  आहेत. 

मुंबईत घडलेल्या घटनेनंतर ठाणे महापालिकेच्या अग्निशमन दलामार्फत एनओसी नसलेल्या शहरातील सुमारे 458 हॉटेल्स, पबला नोटीसा बजावल्यानंतर संबंधीत अस्थापनांनी कागदपत्रांची पूर्तता न केल्याने महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी या सर्व अस्थापना सील करण्याचे आदेश दिले होते. परंतु अवघ्या एका दिवसातच हॉटेल व्यवसायीकांनी महापालिका आयुक्तांची भेट घेतली आणि त्यांना थेट 15 दिवसांची मुदत मिळाली. परंतु पालिकेच्या काही अधिकार्‍यांना 1 कोटी मिळाल्यानेच हॉटेल व्यावसायिकांना मुदतवाढ मिळल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केला आहे. यासंदर्भात त्यांनी आयुक्त आणि पोलीस आयुक्तांना पत्र दिले असून या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे.

मनसेने केलेल्या आरोपामुळे या प्रकरणाला आता वेगळे वळण लागण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. शहरातील 458 हॉटेल अस्थापना सील करण्याचे आदेश आयुक्त संजीव जयस्वाल यांनी दिले होते. त्यानंतर झोपी गेलेले हॉटेल व्यवसायीक जागे झाले आणि त्यांनी रात्रीच पालकमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. तसेच शुक्रवारी महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांची भेट घेतली. दोन तास त्यांची आयुक्तांबरोबर चर्चा सुरु होती. या चर्चेअंती त्यांना 15 दिवसांची मुदतवाढ देण्यात आली.