Fri, Nov 16, 2018 04:55होमपेज › Mumbai-Thane-Raigad › बडोदा बँक दरोड्यातील ११ जणांना अटक

बडोदा बँक दरोड्यातील ११ जणांना अटक

Published On: Dec 06 2017 1:44AM | Last Updated: Dec 06 2017 1:26AM

बुकमार्क करा

नवी मुंबई : प्रतिनिधी   

पालघर, मुंबई, पुणे, धुळे, नागपूर, अमरावती, सिल्वासा, अहमदाबाद, सुरत, राजकोटसह वडोदरा येथे दरोडा, घरफोडीचे शंभर गुन्हे दाखल असलेल्या टोळीने नवी मुंबईतील जुईनगर येथील बडोदा बँकेत भुयार खोदून 27 लॉकर फोडून सोने, चांदी व रोख रक्कम घेऊन पळ काढला होता. या टोळीतील 11 जणांना पोलिसांनी अटक करुन त्यांच्याकडून 5523 ग्रॅम सोने, 412 ग्रॅम चांदी, 24 लाखांची वाहने अशी 1 कोटी 75 लाख 48 हजार 941 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. या टोळीवर मोक्कांतर्गत कारवाई केली जाणार आहे. 

जुईनगर येथील बडोदा बँक दरोड्यातील आरोपींना 21 दिवसांत नवी मुंबई पोलिसांनी अटक केली. बॅँकेवर दरोडा टाकावा यासाठी दरोड्यातील मुख्य आरोपी हाजी अली मिर्झा बेग 2014 पासूनच दरोड्यासाठी जुळवाजुळव व बँकेचा शोध घेत असल्याची माहिती तपासात पुढे आली. अटकेत असलेल्या 11 आरोपींपैकी सहा जणांना  महाराष्ट्रात, तीनजणांना उत्तर प्रदेशात तर एकाला कोलकाता येथे  जावून अटक केली आहे.

जुईनगर सेक्टर 11 मधील बॅक ऑफ बरोडावर भुयार खोदून दरोडा टाकण्यात आला. 13 नोव्हेंबरला बँक उघडल्यावर दरोड्याचा प्रकार उघडकीस आला होता. पाच ते बारा फुट खोल, अडीच फुट रूंद आणि अंदाजे 45 ते 50 फुट लांबवर हे भुयार खोदून हा दरोड टाकण्यात आला होता.  भुयार खोदताना माती पसरू नये यासाठी भुयारात सर्वत्र लाकडी प्लाय लावण्यात आले होते. बॅकेत एकूण 237 लॉकर असून त्यातील 30 लॉकर तोडण्यात आले. कोणते लॉकर तोडण्यात आले आहेत तेही बॅकेने प्रसिध्द केले आहे. सुमारे 70 हून अधिक लॉकर तोडण्याचा प्रयत्न झाला मात्र 30 लॉकर फोडण्यात त्यांना यश आले.
याप्रकरणी पोलिसांनी 11 जणांना अटक केली असून त्यांचा साथीदार गेनाप्रसाद हा दरोडा टाकण्यापूर्वीच एक महिना अगोदर मेंदूच्या आजाराने मयत झाला होता. 

बडोदा बँक दरोडाप्रकरणी श्रावण हेगडे, मोईन खान, हाजी अली मिर्झा बेग,अंजन मांझी उर्फ अंजु यांना गोवंडी बैंगनवाडीतून अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली इर्टीगा व काही दागिनेही हस्तगत करण्यात आले आहे. त्यांनी संजय वाघ या मालेगावच्या सोनाराला दरोड्यातील सोने विकले होते. पोलिसांनी मोईद्दीन शेख यास कोलकाता हावडा, किशन मिश्रा यास उत्तर प्रदेशातून, शुभम वर्मा यास अलाहाबाद,आदेश वर्मा अलाहाबाद तर  हाजी अलीची बहीण मेहरून्निसा हिला पुण्यातून अटक केली.