Fri, Nov 24, 2017 20:16होमपेज › Mumbai-Thane-Raigad › बडोदा बँकेतील भुयारी लूट २.८५ कोटींची

बडोदा बँकेतील भुयारी लूट २.८५ कोटींची

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

नवी मुंबई:प्रतिनिधी 

जुईनगर येथील बँक ऑफ बडोदात भुयार खोदून झालेल्या घरफोडीत 30 लॉकरधारकांचे लॉकर फोडण्यात आले असून, त्यापैकी 28 जणांचे सविस्तर जबाब मंगळवारी नोंदविण्यात आले आहेत. त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत  10 हजार 586 ग्रॅम सोन्याचा,  तर 6 हजार 391   ग्रॅम चांदीचा ऐवज, 70 हजार रुपये  रोख रक्कम, 50 हजाराची हिर्‍याची अंगठी, असा एकूण 2 कोटी 85 लाख 2 हजार  300 रुपयांचा ऐवज लुटण्यात आला आहे. उर्वरित 80 सुरक्षित लॉकर्समधील ऐवज परत देण्यात आला आहे, अशी माहिती पोलीस उपायुक्त डॉ. सुधाकर पठारे यांनी दै. पुढारीशी बोलताना दिली.

सोमवारी सकाळी ही घटना उघडकीस आली होती. बाजूच्या एका दुकानामधून पन्नास फुट भुयार खोदून दरोडेखोरांनी बँकेतील लॉकर रूमपर्यंत प्रवेश मिळविल्याचे स्पष्ट झाले होते. विशेष म्हणजे चार महिने गाळा भाड्याने घेवून या ठिकाणी किराणा मालाचे दुकान थाटण्यात आले होते. सोमवारी घरफोडीची घटना उघडकीस आल्यानंतर मंगळवारी सकाळपासून बँकेसमोर लॉकर्स रिकामे करण्यासाठी लॉकर्सधारकांनी गर्दी केली. बँक व्यवस्थापनाच्या कुचकामी सुरक्षा व्यवस्थेवर लॉकर्स धारकांनी आणि खातेदारांनी तीव्र संताप व्यक्‍त केला. दरम्यान चोरट्यांंचा शोध घेण्यासाठी पोलिसांची सहा पथके रवाना झाली आहेत. सर्वच बँकांमध्ये अत्याधुनिक सुरक्षा व्यवस्था असते. मात्र या बँकेतील 28 लॉकर्स फोडेपर्यंत कुठेही सायरन वाजला नाही. याबाबत खातेदारांनी शंका उपस्थित केल्या.

घरफोड्या वाढल्या म्हणून लॉकर घेतले

सानपाडा परिसरात घरफोड्यांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे एक लाख रुपये अनामत रक्‍कम भरुन लॉकर घेतले आणि त्यामध्ये 55 तोळे सोन्याचे दागिने ठेवले.  बँकेला दागिने संभाळता येत नाहीत तर त्यांनी लॉकर कशाला दिले. आता बँकेतील लॉकर्स  फुटू लागले तर दागिने ठेवायचे कसे, अशा शब्दांत बबनराव मारुती गव्हाणे यांनी संताप व्यक्‍त केला.

तीन लॉकर्समध्ये 135 तोळे सोने

दरोडेखोरांनी फोडलेल्या 30 लॉकर्सपैकी तीन लॉकर्समध्ये एकूण 135 तोळे सोन्याचे दागिने असल्याचे लॉकर्सधारकांनी सांगितले. हे तिन्ही लॉकर्सधारक सानपाडा परिसरात राहत असून मध्यमवर्गीय आहेत. या घरफोडीमुळे लॉकरधारक हवालदिल झाले आहेत.

25 हजार भाडे, 500 रुपयांचा धंदा

दरोडेखोेरांनी बडोदा बँक लुटण्यासाठी भक्‍ती रेसिडेन्सीमधील सात क्रमांकाचा गाळा पाच महिन्यापूर्वी भाड्याने घेतला आणि तिथे बालाजी जनरल स्टोअर्स हे दुकान थाटले. सुरुवातीला दोन महिने तिथे फरसाण विकले. त्यानंतर अन्य वस्तू विकण्यास सुरुवात केली. या दुकानाचा दररोजचा धंदा 500 रुपयांच्या आसपास होता. दरोडेखोर भाडे मात्र महिन्याला 25 हजार रुपये भरत होते.

पोलीस अधिकार्‍यांची मॅरेथॉन बैठक

भुयार खोदून बडोदा बँक फोडणार्‍या दरोडेखोरांना पकडण्यासाठी आणि या गुन्ह्यांची उकल तातडीने करण्यासाठी पोलीस आयुक्‍त हेमंत नगराळे, पोलीस उपायुक्‍त सुधाकर पठारे, तुषार दोषी यांच्या वरिष्ठ अधिकार्‍यांची आज मॅरेथॉन बैठक झाली. सकाळी सुरु झालेली ही बैठक दुपारपर्यंत सुरु होती.