Sun, Aug 18, 2019 20:40होमपेज › Mumbai-Thane-Raigad › बार डान्सरला बेदम मारहाण

बार डान्सरला बेदम मारहाण

Published On: Aug 07 2018 1:42AM | Last Updated: Aug 07 2018 1:09AMडोंबिवली : वार्ताहर

कल्याण पूर्वेतील वादग्रस्त रंगीला डान्स बारमध्ये अवघ्या 13 वर्षीय मुलीकडून बार डान्सरचे काम करवू नका, अशी विनवणी करणार्‍या एका बार डान्सरला मॅनेजरसह बारच्या मालकांनी बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली असून मॅनेजर रियाज, मालक चंद्रहन्स, श्रीधर, नवीन या चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कल्याण पूर्वेकडील मलंग रोडस्थित रंगीला डान्सबार वादग्रस्त म्हणून प्रसिद्ध आहे. त्यातच बारमध्ये दोन दिवसांपूर्वी घडलेल्या एका घटनेमुळे हा बार पुन्हा एकदा वादाच्या भोवर्‍यात सापडला आहे. या बारमध्ये गाणी गाऊन आणि डान्स करून उदरनिर्वाह करणार्‍या मनप्रित कौर ही बारमधील ऑर्केस्ट्राच्या स्टेजवर होती. याच दरम्यान तिच्या बाजूला एक अल्पवयीन मुलगी येऊन बसली. मात्र ती अतिशय लहान असल्यामुळे मनप्रीतने बारचा मॅनेजर रियाज याला ही मुलगी लहान असून तिला या कामाला जुंपू नकोस, अशी विनंती केली. 

मात्र संतापलेल्या रियाजने मनप्रीतला शिव्या देत धक्काबुक्की केली. यामुळे मनप्रीतने प्रतिकार करताना मॅनेजर रियाजला हातातील प्लास्टिकची बाटली फेकून मारली. त्यामुळे संतापलेल्या रियाज याच्या बरोबरच बारमालक चंद्रहन्स, श्रीधर आणि नवीन यांच्याबरोबरच इतर स्टाफने मनप्रीतला स्टेजवरून केसाला धरून फरपटत मेकअप रूममध्ये नेत लाथा-बुक्क्यांनी बेदम मारहाण केली.त्यानंतरही या बारमधील त्यांचे साथीदार मेकअप रूममध्ये येऊन त्यांनी देखील शिवीगाळ करत मारहाण केली. तसेच इतर कुठे काम केले तर जीवे ठार मारू अशी धमकी दिल्याचे तिने तक्रारीत म्हटले आहे.

पोलिसांना मॅनेज करून बारचा धंदा...

धक्कादायक बाब म्हणजे यावेळी मनप्रीतला ‘आमच्या विरोधात पोलीस केस केलीस तर तुला भारी पडेल. पोलीस आमचे काहीही करू शकणार नाहीत. पोलिसांना मॅनेज करूनच आम्ही बार चालवत असतो,’ असाही दम भरल्याचे तिने तक्रारीत नमूद केले आहे. या घटनेनंतर भयभीत झालेल्या मनप्रीतने मदतीसाठी 100 नंबरवर फोन करून सर्व घडलेली हकीकत सांगितली. मात्र तेथून आपल्याला मदत केली नसल्याचा गंभीर आरोप तिने केला आहे. या प्रकरणी न्याय मिळावा व अल्पवयीन मुलींना या व्यवसायात जुंपणार्‍यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करत आपला तक्रार अर्ज पोलीस उपयुक्तांसह महिला आयोगाकडे दिला आहे.