होमपेज › Mumbai-Thane-Raigad › इसिसकडून वापरल्या जाणार्‍या ‘फायटर ड्रग्ज’चा साठा जप्त

इसिसकडून वापरल्या जाणार्‍या ‘फायटर ड्रग्ज’चा साठा जप्त

Published On: May 30 2018 1:05AM | Last Updated: May 30 2018 1:05AMमुंबई : पुढारी वृत्तसेवा

रेव्हेन्यू इंटेलिजन्स संचालनालयाने रविवारी जेएनपीटी नजीक  द्रोणागिरी येथे धाड टाकून 50 कोटी रुपयांचे ट्रॅमाडॉल जप्त केले. यात 6.09 कोटी टॅब्लेट्स आणि 2.6 टन टॅब्लेटचा समावेश आहे. याप्रकरणी शनिवारी रात्री तीन लोकांना अटक करण्यात आली असून यात औषध कंपनीच्या मालकाचा समावेश आहे. जगभरासाठी डोकेदुखी ठरलेल्या इसिस या दहशतवादी संघटनेच्या दहशतवाद्यांकडून ट्रॅमाडॉलचा सर्वाधिक वापर केला जातो. त्यामुळे या कारवाईचे 
गांभीर्य अधिक वाढले आहे.

राज्यात अशा प्रकारची ही पहिलीच कारवाई आहे.ट्रॅमाडॉलची आंतरराष्ट्रीय पातळीवर तस्करी केली जाते. इसिसला ट्रॅमाडॉलचा सर्वाधिक पुरवठा केला जातो. इसिसचे दहशतवादी वेदनांचे शमन करण्यासाठी आणि जखमी अवस्थेत अधिक ऊर्जा निर्मिती करण्यासाठी या अंमली पदार्थांचा वापर करतात. त्यामुळेच ट्रॅमाडॉललला फायटर ड्रग म्हणूनही ओळखले जाते.  

अंमली पदार्थांच्या आहारी गेलेल्यांकडून ट्रॅमाडॉलचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. भारत सरकारने अलिकडेच एनडीपीएस अ‍ॅक्टच्या कक्षेत ट्रॅमाडॉलचा समावेश केला आहे. नोंदणी न करता तसेच नार्कोटिक्स आयुक्तांची पूर्व परवानगी न घेता ट्रॅमाडॉलचे उत्पादन करणे हा गुन्हा आहे. 

रेव्हेन्यू इंटेलिजन्सच्या संचालनालयाच्या मुंबई युनिटला पालघरमधील एक औषध कंपनी ट्रॅमाडॉलचे उत्पादन आणि व्यापारात सहभागी असल्याची माहिती मिळाली होती. मिळालेल्या माहितीनुसार अधिकार्‍यांनी कंपनीच्या पालघरमधील युनिटवर छापा टाकला आणि टॅब्लेट्स जप्त केल्या. चौकशीत मिळालेल्या अधिक माहितीनुसार गोडाऊनवरही छापा टाकण्यात आला. आणि 4.47 कोेटी टॅब्लेट्स जप्त करण्यात आल्या.

औषध निर्मिती करणार्‍या कंपनीचे उत्पादन केंद्र पालघरला असून,  गोदाम मात्र जेएनपीटीनजीक द्रोणागिरी येथे आहे. तपास यंत्रणा या प्रकरणाचा कसून तपास करीत आहेत.  साठा करण्यात आलेले ट्रॅमाडॉल कुठे पाठवले जाणार होते, त्याचा इसिसचा प्रभाव असलेल्या भागात पुरवठा केला जाणार होता का, ट्रॅमाडॉलचा पुरवठा करणारी साखळी आहे का, त्या साखळीचे दुवे कोण आहेत, मुंबई आणि परिसरात त्याचे वितरण केले जाते का, असे असंख्य प्रश्‍न या कारवाईनंतर निर्माण झाले आहेत. 

पालघर एमआयडीसीतील एका औषध निर्मात्या कंपनीत बंदी घालण्यात आलेले ट्रॅमाडॉल या ड्रग्जचे उत्पादन करण्यात येत असल्याची पक्की खबर अधिकार्‍यांना मिळाली होती. या कंपनीवर टाकलेल्या धाडीत या अतिरेकी ड्रग्जच्या गोळ्या मिळाल्याच शिवाय नवी मुंबईतील गोडाऊनचाही धागा मिळाला. या गोडावूनमध्ये 4.47 कोटी गोळ्या आढळल्या.