Tue, Jul 16, 2019 12:00होमपेज › Mumbai-Thane-Raigad › बँकांचे खासगीकरण आताच व्हावे : नीलेकणी

बँकांचे खासगीकरण आताच व्हावे : नीलेकणी

Published On: Mar 24 2018 11:24AM | Last Updated: Mar 24 2018 11:24AMमुंबई : पुढारी वृत्तसेवा

सरकारी बँकांचे बँकिंग क्षेत्रावर अजून प्रभुत्व आहे, तोवरच या बँकांचे खासगीकरण करायला हवे. काही काळानंतर त्यांचे वर्चस्व संपल्यावर खासगीकरणाचा विषय निघाला, तर त्यावेळी त्यांचे मूल्य सध्या इतके असणार नाही, असे मत इन्फोसिसचे अध्यक्ष नंदन नीलेकणी यांनी व्यक्त केले.

सरकारी बँकांचे आताच खासगीकरण केले, तर त्यात ग्राहकांचे व देशातील करदात्यांचेही भले होईल. अन्यथा या बँकांचे खासगीकरण सध्याही धीम्या गतीने,
अप्रत्यक्षपणे होतच आहे. ते मान्य करू घ्यावे लागेल, असे सांगून नीलेकणी म्हणाले की, बँकिंग क्षेत्रातील सरकारी बँकांचे वर्चस्व सध्या कमी होत आहे. सध्या या बँकांकडे बाजारपेठेतील 70 टक्के हिस्सा आहे. वर्षाला 4 टक्के या गतीने त्या बाजारपेठ गमावत आहेत. यामुळे येत्या 10 वर्षांत त्यांच्याकडे बाजारपेठेतील हिस्सा
खूपच कमी राहील. तो 10 टक्केही असू शकेल. 

याबाबतीत, दूरसंचार क्षेत्राचे उदाहरण घेता येईल. काही वर्षांपूर्वी बीएसएनएल या सरकारी कंपनीचे बाजारपेठेवर वर्चस्व होते. त्यावेळी खासगी कंपन्यांचा नुकताच शिरकाव झाला होता. आता 4 मोठ्या कंपन्यांनी बाजारपेठ बळकावली असून बीएसएनएलकडे किरकोळ हिस्सा शिल्लक आहे. हवाई वाहतूक क्षेत्रात एअर इंडियाच्या बाबतीत हेच घडले. म्हणूनच खासगीकरण लांबणीवर टाकत या बँकांचे मूल्य कमी होऊ देण्याऐवजी, आताच्या चढ्या भावांना त्या खासगी कंपन्यांकडे सुपूर्द करणे श्रेयस्कर ठरेल. या प्रकारे या बँकांची प्रगती होत राहील व सामान्य करदात्यांचा पैसाही सुरक्षित राहील, असे नीलेकणी यांनी नमूद केले.

बँकांचे खासगीकरण आताच व्हावे, हे नमूद करण्यामागे या क्षेत्रातील वाढते तंत्रज्ञान व त्याचा प्रभाव हेही कारण आहे, असे नीलेकणी म्हणाले. बँकांचा कारभार यशस्वी व्हायचा असेल, तर त्यांना अद्ययावत तंत्रज्ञान वापरणे व त्याचे सातत्य राखणे अनिवार्य ठरते. या तंत्रज्ञानासाठी सुविद्य व अतिहुशार माणसांची गरज लागते. खासगी बँका त्यासाठी तजवीज करू शकतात. सरकारी बँकांना ते करणे शक्य नसते. त्यामुळेही त्या मागे पडतात, असे नीलेकणी यांनी म्हटले.

या प्रसंगी कोटक महिंद्र बँकेचे अध्यक्ष उदय कोटक हेही उपस्थित होते. त्यांनी नीलेकणी यांच्या मताला दुजोरा दिला. ते म्हणाले की, बँकांचे बाजारपेठेतील स्थान हे त्या कोणते तंत्रज्ञान वापरतात, यावर अवलंबून राहणार आहे. डिजिटल तंत्रज्ञान, ई-केवायसी, डाटाच्या माध्यमातून कर्जवितरण हे यापुढे परवलीचे शब्द बनणार
आहेत. पेमेंट करण्याच्या पद्धतींमध्ये आधार या संकल्पनेचा मोठा आधार असणार आहे. आर्थिक व्यवहारांचे स्वरूपच या आधारमुळे बदलून जाणार आहे.

Tags : Banks,  private,Nandan Nilekani