Tue, Apr 23, 2019 08:02होमपेज › Mumbai-Thane-Raigad › बांद्रा- वर्सोवा सीलिंकचे काम ऑक्टोबरपासून

बांद्रा- वर्सोवा सीलिंकचे काम ऑक्टोबरपासून

Published On: May 07 2018 2:03AM | Last Updated: May 07 2018 1:26AMमुंबई : प्रतिनिधी

बांद्रा- वर्सोवा सीलिंकचे घोडेे अखेर समुद्रात न्हाले असून या रस्त्याचा ठेका जॉइंट व्हेंचर असलेल्या रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्‍चर व इटालीच्या अस्ताल्दी या कंपनीस मिळाला आहे. हा रोड 10 किलोमीटर लांबीचा असून पाच वर्षांत पूर्ण करायचा आहे. त्यासाठी 6994 कोटी रुपये खर्च येणार आहे. राज्य सरकारने मागवलेल्या निविदेमध्ये ही निविदा सर्वात कमी रकमेची असल्याने त्यास मान्यता देण्यात आली. मात्र, नोव्हेंबर 2016 मध्ये तयार करण्यात आलेल्या अंदाजित रकमेपेक्षा ही निविदा 1477 कोटींनी अधिक आहे. 

बांद्रा- वर्सोवा सीलिंकसाठी नोव्हेंबर, 2016 मध्ये  5516 कोटी रुपयांचा अंदाजित खर्च गृहीत धरण्यात आला होता. मात्र, आता त्यात वाढ होऊन हा खर्च 6994 कोटी रुपयांवर गेला आहे. या सीलिंकचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर बांद्रा-वर्सोवा यामधील प्रवासाच्या वेळेत 10 मिनिटांची बचत होणार आहे. साधारणतः ऑक्टोबर, 2018 मध्ये सीलिंकच्या प्रत्यक्ष बांधकामास सुरुवात होणार असून 2023 मध्ये तो पूर्ण करण्यात येणार आहे.  

बांद्रा-वर्सोवा सीलिंक हा कोस्टल रोड प्रोजेक्टचा महत्त्वाचा भाग असून त्यामुळे दक्षिण मुंबई व पश्‍चिम उपनगरे जोडली जाणार आहेत. तसेच हा रोड वापरात आल्यानंतर वाहनधारकांसाठी त्यावर किमान टोल 130 रुपये असेल.

शुक्रवारी एमएसआरडीसीची बोर्ड मीटिंग पार पडली. त्यामध्ये अंदाजित रकमेपेक्षा 1477 कोटी रुपयांची वाढ असलेल्या  या निविदेस मान्यता देण्यात आली. तथापि, एमएसआरडीसीच्या अभियंत्यांनी पहिला अंदाज हा दोन वर्षांपूर्वीचा होता व आता वाढीव रकमेच्या निविदेस दिलेली मान्यता ही योग्य असल्याचे सांगून निविदेचे समर्थन केले आहे.  

Tags : Mumbai, mumbai news, Bandra-Versova sealink, work, October,