Mon, Sep 24, 2018 05:16होमपेज › Mumbai-Thane-Raigad › बांद्रा स्टेशनलगतची वाहतूक कोंडी सुटणार

बांद्रा स्टेशनलगतची वाहतूक कोंडी सुटणार

Published On: Dec 19 2017 2:02AM | Last Updated: Dec 19 2017 1:39AM

बुकमार्क करा

मुंबई : प्रतिनिधी 

बांद्रा रेल्वेस्टेशनच्या पश्‍चिमेला होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी मुंबई महापालिकेने स्टेशनलगतचा रस्तारूंदीकरणाचा निर्णय घेतला आहे. यासाठी पश्‍चिम रेल्वेची जागाही खरेदी करून तेथील बांधकामे तोडण्यात येणार आहेत. त्यामुळे गेल्या कित्येक वर्षापासून वाहतूक कोंडीपासून त्रस्त असणार्‍या बांद्रावासियांना मोठा दिलासा मिळणार आहे.

पश्‍चिम रेल्वे मार्गावरील बांद्रा रेल्वे स्टेशन हे वर्दळीचे स्टेशन आहे. विशेषत: पश्‍चिमेला जाणार्‍या प्रवाशांची संख्या जास्त असल्यामुळे येथे नेहमीच गर्दी असते. त्यात बेस्टचे मोठे स्थानकही रेल्वे स्टेशनला खेटून उभे आहे. पण स्टेशनकडे येणारे सर्वच रस्ते अरूंद असल्यामुळे येथे मोठ्याप्रमाणात वाहतूक कोंडी होते. त्यामुळे रस्त्यावरून चालणार्‍या पादचार्‍यांसह वाहनांना वाट काढणे मुश्किल जाते. त्यामुळे येथील रस्त्यांचे रूंदीकरण करण्याचा महत्वपुर्ण निर्णय पालिकेने घेतला आहे. 

स्टेशनबाहेरील अनधिकृत बांधकामे व दुकानांवर कारवाई करण्यात आल्यामुळे काही भाग मोकळा झाला आहे. पण स्टेशनलगतची जागा पश्‍चिम रेल्वेच्या मालकीची असल्यामुळे येथील जागा मोकळी करणे पालिकेला शक्य झाले नाही. त्यामुळे गेल्या वर्षभरापासून रेल्वे प्रशासनाकडे पाठपुरावा करून, रेल्वे हद्दीतील जागा मोकळी करून देण्याची मागणी पालिकेने लावून धरली आहे. अखेर रेल्वेने मोबदला घेऊन जागा मोकळी करण्यास तयारी दर्शवली आहे. 

पालिकेनेही रेल्वेला जागेचा मोबदला म्हणून 2 कोटी 25 लाख रुपये देण्याचे मान्य केले आहे. त्यानुसार रेल्वे हद्दीततील कर्मचारी वसाहतसह अन्य बांधकामे तोडण्यात येणार आहेत. त्याशिवाय कर्मचारी वसाहतीत राहणार्‍या कर्मचार्‍यांना पर्यायी जागा देण्यात येणार असल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले. त्यामुळे येथील रस्ता रूंदीकरणाचा मार्ग मोकळा झाला आहे. येत्या दोन ते तीन महिन्यात रेल्वे हद्दीतील बांधकामे तोडूण रस्त्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे एस. व्ही. रोड येथून बांद्रा स्टेशनपर्यंतचा प्रवास जलद होणार असल्याचा दावा पालिकेच्या रस्ते विभागाने केला आहे.