Tue, Apr 23, 2019 01:38होमपेज › Mumbai-Thane-Raigad › परदेशी शिष्टमंडळात मुख्य सचिवांचे बालमित्र

परदेशी शिष्टमंडळात मुख्य सचिवांचे बालमित्र

Published On: May 11 2018 2:16AM | Last Updated: May 11 2018 2:00AMमुंबई : प्रतिनिधी

मंत्रालयात देश विदेशातून अनेक शिष्टमंडळे येतात; चर्चा होते. असेच एक बांगला देशातील माध्यम प्रतिनिधींचे शिष्टमंडळ राज्याचे  मुख्य सचिव डी. के. जैन यांना भेटण्यासाठी आले होते. या भेटीत जैन यांना त्यांचे सहाव्या  इयत्तेपासून ते अकरावीपर्यंत एकत्र असलेले शाळासोबती भेटले आणि या  आठवणींची  मैफल रंगली . या दोघांसाठीही ही भेट म्हणजे मर्मबंधातली ठेवच ठरली. 

हे शिष्टमंडळ दोन दिवसांच्या भेटीवर आले आहे. सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास ते मुख्य सचिवांच्या समितीकक्षात पोहोचले. स्वागताचा औपचारिक कार्यक्रम झाल्यावर जैन यांनी राज्याच्या प्रगतीचा आढावा घेतला.शिष्टमंडळातील सदस्यांनी मुबंईच्या आठवणी बांगलादेशमधील मुंबई, बॉलिवुडचे आकर्षण यांच्या आठवणींचे पदर उलगडले. तर औपचारिक चर्चेत दोन्ही देशातील संबंध, औद्योगिक गुंतवणुकीवरही चर्चा झाली. 

राजशिष्टाचारानुसार औपचारिक वातावरणात ही चर्चा सुरू असतानाच शिष्टमंडळातील सदस्य अल्तमास कबीर हे उठुन  थेट जैन यांच्या आसनाजवळ गेले व त्यांनी मित्रा आपण एका शाळेत नव्हे तर एकाच वर्गात होतो याची आठवण करून दिली. मुख्य सचिव जैन यानांही  हा सुखद धक्का होता. त्याचबरोबर उपस्थीतही या प्रसंगाने भारावले. 

जैन व कबीर हे 1971 ते  1976  याकाळात राजस्थानमधील अजमेरच्या मेयो माध्यमिक विद्यालयात एकाच वर्गात  होते.शाळा सोडल्यानंतर पहिल्यांदाच झालेल्या या भेटीने दोघेही भाराऊन गेले. त्यावेळी आपल्या वर्गात आणखी कोण कोण शिकत होते त्याच्या आठवणी रंगल्या आणि आठवणींचे  एकापाठोपाठ एक पदर उलगडताना बैठकीतला औपचारिकपणा कुठल्याकुठे पळाला  व  ही  मैफल रंगतच गेली. कबीर यांनी आपल्या बालमित्राला बांगलादेशला येण्याचे निमंत्रण दिले आणि आयुष्यभर  जपण्यासारख्या आठवणी मनात  साठवत यांनी निरोप घेतला.