Sun, Apr 21, 2019 00:29होमपेज › Mumbai-Thane-Raigad › नवी मुंबईत आज बाळासाहेब ठाकरे रोजगार मेळावा  

नवी मुंबईत आज बाळासाहेब ठाकरे रोजगार मेळावा  

Published On: Sep 08 2018 1:32AM | Last Updated: Sep 07 2018 6:43PMनवी मुंबई : प्रतिनिधी 

नवी मुंबई येथे उद्या  शनिवारी  ‘बाळासाहेब ठाकरे रोजगार मेळाव्या’चे आयोजन करण्यात आले आहे. सार्वजनिक बांधकाममंत्री तथा ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या मेळाव्याचे उद्घाटन होणार आहे. उद्योगमंत्री सुभाष देसाई यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

पुणे जिल्ह्यातील हडपसर या ठिकाणी १६ जून रोजी पहिला बाळासाहेब ठाकरे रोजगार मेळावा घेण्यात आला. पहिल्या मेळाव्याच्या यशानंतर राज्यभरातून मेळावे घेण्याची मागणी होत आहे.  त्यानुसार ८ सप्टेंबर  रोजी नवी मुंबईतील सिडको  प्रदर्शन केंद्रामध्ये हा मेळावा होणार आहे. ऑनलाइन तसेच ऑफलाइन पद्धतीने इच्छुक उमेदवारांची नोंदणी करण्यात येत आहे. ७ सप्टेंबर पर्यंत इच्छुक उमेदवार रोजगार मेळाव्यासाठी नोंदणी करू शकतात.

या मेळाव्यातून सुमारे दहा हजार मुला-मुलींना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्याचा राज्य शासनाचा मानस आहे. यासाठी नवी मुंबई परिसरातील सुमारे ४२७ कंपन्यांनी रोजगार मेळाव्यात सहभागी होण्याची  तयारी दर्शविली आहे. मुला-मुलींना पदवीनुसार विविध कंपन्यांमध्ये मुलाखतीची संधी दिली जाणार आहे. आयटीआय, अभियांत्रिकी, माहिती तंत्रज्ञान, व्यवस्थापन, बँकिंग आदी शाखांतील मुलांना नोकरीची संधी मिळणार आहे.

राज्य शासनाचा उद्योग विभाग तसेच सीआयआय या उद्योग संघटनेचा या उपक्रमात प्रमुख सहभाग आहे.  या मेळाव्यासाठी खासदार राजन विचारे, आमदार मंदा म्हात्रे, आमदार संदिप नाईक, महापौर जयवंत सुतार व मुंबई इमारत दुरुस्ती मंडळाचे सभापती विजय नहाटा यांची विशेष अतिथी म्हणून उपस्थिती राहणार आहे.