होमपेज › Mumbai-Thane-Raigad › कलंक; तुम्ही थूकत राहा, ते धुवत राहतील!

कलंक; तुम्ही थूकत राहा, ते धुवत राहतील!

Published On: Jun 28 2018 9:29AM | Last Updated: Jun 28 2018 9:29AMबदलापूर : पंकज साताळकर

स्वतःला सुसंस्कृत, शांत, नोकरदारवर्गाचे नैसर्गिक सौंदर्य लाभलेल शहर अशी बिरुद मिरवणार्‍या बदलापूरकरांनी आता आपण थुंकणार्‍यांचे शहर हा कलंक देखील लावून घेण्यात कुठेही कमी पडलेलो नाही, हेच दाखवून दिले आहे. कारण बदलापूर पूर्व आणि पश्‍चिमेला असलेल्या आकर्षक रंगसंगती केलेला स्कायवॉक नागरिकांनी अक्षरशः पिचकार्‍यांनी रंगवून ठेवला आहे. मात्र, मात्र असे असले तरी हे आणि रंगवलेले चित्र स्वच्छ करण्यासाठी काही हात पुढे येत आहेत. त्यामुळे तुम्ही थूकत राहा, ते धुवत राहतील, असेच खेदाने म्हणावे लागेल.

बदलापूर पूर्व आणि पश्‍चिमेला स्कायवॉकला जोडणारा पादचारी पूल हा चार वर्षांपूर्वी तयार करण्यात आला होता. या पुलाचे काम झाल्यानंतर गेल्याच वर्षी रोटरी क्लब ऑफ बदलापूरने या पुलाची रंगरंगोटी करून घेते आकर्षक चित्रदेखील काढली होती. तेथे थुंकू नये असे स्वच्छतेचा संदेश देणारे आकर्षक कॅलिग्राफी ही या माध्यमातून रेखाटण्यात आली होती. बदलापूरकरांनी मात्र या स्वच्छ आणि सुंदर अशा पुलावर पान आणि गुटखा खाऊन थूंकून थूंकून अक्षरशः त्या रंगाचा बेरंग केला आहे.

दरम्यान, रंगवलेले चित्र स्वच्छ करण्यासाठी काही हात पुढे येत आहेत. मध्य रेल्वेने सध्या रेल्वे ट्रॅक आणि स्वच्छतेची मोहीम हाती घेतली आहे. त्याच माध्यमातून बदलापूरचा पूल स्वच्छ करताना काही तरुणांचे हात दिसत आहेत. स्वच्छ भारत अभियान राबवत असताना आपण गुटखा आणि तंबाखू खाऊन असं थूंकून खरोखरच आपले शहर स्वच्छ होईल का? याचा विचार आत करायची वेळ आली आहे.

थुंकणार्‍यांना या शहराच्या स्वच्छतेशी काहीच घेणेदेणे नाही, हे यावरून स्पष्ट होत आहे. आता हा ब्रिज धुवून स्वच्छ करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने पुढाकार घेतला आहे. आपल्या शहराचे नावही अस्वच्छ शहरांमध्ये जाऊ नये असे खरोखरच वाटत असेल तर यापुढे थुंकणार्‍यांना रोखणे गरजेचे असल्याचे मत सूज्ञ नागरिकांकडून व्यक्त होत आहे.