Sun, Jul 21, 2019 10:11होमपेज › Mumbai-Thane-Raigad › नॉनस्टॉप संमेलनाला बॅकस्टेज आर्टिस्टचे बळ

नॉनस्टॉप संमेलनाला बॅकस्टेज आर्टिस्टचे बळ

Published On: Jun 17 2018 2:09AM | Last Updated: Jun 17 2018 1:44AMठाणे : अनुपमा गुंडे

नाट्यसंमेलनाचा आस्वाद घेणार्‍या कुणाला पाणी हवंय, संमेलनाला आलेल्या एखाद्या आजोबांना नाट्यगृहांच्या पायर्‍या उतरतांना आधार हवाय, कलाकारांना, प्रमुख पाहुण्यांना काय हवं, काय नको सामान्य रसिक ते व्हीआयपी आणि व्हीव्हीआयपी अशी सगळ्यांची बडदास्त 98 व्या अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनात रंगमंच कामगारांनी  (बॅकस्टेज आर्टिस्ट) ठेवली. रंगभूमीच्या  अंगा - खांद्यावर रोजी - रोटी अवलंबून असणार्‍या या कामगारांनी संमेलनाचे 60 तास अतिशय शिस्तबद्ध आणि विन्रमपणे सेवा देत संमेलनाच्या यशस्वितेत सिंहाचा वाटा उचलला. नाट्यसंमेलनाचा सलग 60 तासांचा अंक या कामगारांमुळे यशस्वी झाला. 17 ते 70 वयोगटांतील लोकांनी यात मेहनत घेतली. काळा टी- शर्ट आणि डोक्यावर पांढरी टोपी, अशी ही रंगमंचीय कामगारांची वेशभूषा संमेलनात सर्वांचेच लक्ष वेधून घेत होती. 

साहित्य, नाट्यसंमेलनासारख्या मोठ्या सांस्कृतिक उत्सवात कार्यकर्त्यांची वानवा नेहमीच जाणवते. संमेलनांच्या व्यासपीठावर मिरविण्यासाठी अनेक जण पुढे - पुढे करतात, मात्र संमेलनासाठी राबवणार्‍या हातांची उणीव जाणवते. अर्थात  कार्यकर्त्यांची वानवा. 98 व्या संमेलनात जाणवली नाही. या संमेलनात नाटकात पडद्यामागची भूमिका बजावणार्‍या बॅकस्टेज आर्टिस्ट अर्थात रंगमंच कामगार मंच, मुंबई या कामगारांनी संमेलनात स्वयंसेवक म्हणून काम करत संमेलनाच्या नाटकांचा अंक यशस्वीपणे पार पडला. पडद्यामागची आणि पडद्याबाहेरची जबाबदारी पेलणार्‍या व्यवस्थेचे लीडर म्हणून मंचचे रत्नकांत जगताप यांनी  काम पाहिले. याबाबत त्यांच्याशी संवाद साधला असता, ते म्हणाले, नाट्यसंमेलन मुलुंड मध्ये होणार हे ठरल्यापासूनच नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रसाद कांबळी यांनी आमच्यावर ही जबाबदारी सोपविली होती. 

त्यामुळे मे महिन्यापासूनच आम्ही कामाला लागलो होतो. पण संमेलनाची खरी परीक्षा संमेलनाच्या 3 दिवसांच्या काळात असते. यंदाचं संमेलन तर सलग 60 तास होते, त्यामुळे संमेलनाचे हे शिवधनुष्य पेलण्याची जबाबदारी जशी सगळ्यांची होती तशीच आमचीही होती. 

संमेलनाच्या 60 तासांच्या आम्ही घेतलेल्या जबाबदारी काळात काही उणं पडू नये,  याची आम्ही पूर्ण खबरदारी घेतली. संमेलनाच्या चोख व्यवस्थेसाठी आमच्या कामगारांच्या आम्ही वेगवेगळ्या समित्या केल्या. या समित्यांमध्ये प्रत्येक समितीला वेगळा प्रमुख म्हणून एकेकावर जबाबदारी सोपविली. दिंडी समिती, रंगमंच समिती, रंगमंच व्यासपीठानुसार अशा 10 समित्या केल्या. या समित्यांनुसार आम्ही कामाची विभागणी केल्याचे जगताप म्हणाले.