Sun, Jul 21, 2019 09:52होमपेज › Mumbai-Thane-Raigad › वाघ-सिंहाच्या सरकारमध्ये उंदराचे घोटाळे धक्कादायक: बच्चू कडू 

'वाघ-सिंहाच्या सरकारमध्ये उंदराचे घोटाळे धक्कादायक'

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

डोंबिवली : वार्ताहर

राज्यात एकीकडे वाघ आणि सिंहाचे सरकार असताना त्यांच्या राज्यात उंदराचे घोटाळे होत असून भ्रष्टाचाराने किती खालची पातळी गाठली हे यावरून दिसत असल्याची टीका प्रहार संघटनेचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांनी सेना-भाजपवर केली. कल्याण-डोंबिवलीतील बीएसयूपी बधितांशी चर्चा करण्यासाठी आमदार बच्चू कडू कल्याणात आले होते. त्यावेळी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना सेना-भाजपवर सडकून टीका केली.

याआधी लोकांना चारा घोटाळ्याचे खूप कौतूक वाटायचे. मात्र शिवसेनेसारख्या वाघाच्या आणि भाजपसारख्या सिंहाच्या सरकारमध्ये अशा प्रकारचे घोटाळे होत असतील तर आश्चर्यकारक आहे. संपूर्ण मुंबईत जेवढे उंदीर नाहीत तेवढे मंत्रालयात आले कसे, असा सवाल विचारत आमदार कडू यांनी सेना-भाजप सरकारच्या कामाचे वाभाडे काढले. तर गेल्या 50 वर्षांत जेवढा चहा प्यायला गेला नाही तेवढा चहा अवघ्या तीन वर्षांत या सरकारने कसा प्यायला? बहुतेक पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांपासून त्यांनी प्रेरणा घेऊन एवढा चहा प्यायला असावा आणि चहाचा असणारा अनुशेष भरून काढला असेल अशी मिश्किल टिप्पणीही करण्यास आमदार कडू विसरले नाहीत. तर कल्याण-डोंबिवली महापालिकेला आपण 1 महिन्याचा अवधी देत आहोत. तेवढ्या काळात त्यांनी बीएसयूपीच्या पात्र लाभार्थ्यांना घरांचे वितरण करावे. अन्यथा त्यानंतर आपण स्वतः प्रहार संघटनेमार्फत या लाभार्थ्यांना ही घरे वाटून मोकळे होऊ, असा इशाराही आमदार बच्चू कडू यांनी यावेळी कल्याण-डोंबिवली महानगरपालिका प्रशासनाला दिला. आपल्या आगळ्या वेगळ्या आणि तितक्याच उग्र आंदोलनासाठी प्रसिद्ध असणाऱ्या आमदार बच्चू कडू यांनी दिलेला हा इशारा महापालिका प्रशासन कितपत गांभीर्याने घेते हे येणाऱ्या काळातच स्पष्ट होईल.

दरम्यान यावेळी झालेल्या बैठकीला प्रहार संघटनेचे संपर्क प्रमूख ऍड. अजय तापकीर, संघटक सुनिल शिरीस्कर, सिद्धार्थ बोराडे, प्रदीप सोनवणे, कुणाल कांबळे, उमेश जैस्वार यांच्यासह अनेक पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

Tags : Bacchu Kadu, BJP,Shiv Sena, State Government


  •