Tue, Jul 23, 2019 02:23होमपेज › Mumbai-Thane-Raigad › चैत्यभूमीवर उसळला निळा सागर

चैत्यभूमीवर उसळला निळा सागर

Published On: Dec 07 2017 2:06AM | Last Updated: Dec 07 2017 2:04AM

बुकमार्क करा

मुंबई : प्रतिनिधी 

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 61 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी देशाच्या कानाकोपर्‍यातून लाखोंच्या संख्येने भीमसैनिक चैत्यभूमीवर आले होते. ओखी चक्रीवादळामुळे मुंबईत पाऊस पडल्याने मंगळवारी गोंधळ झाल्यानंतरही  भीमसैनिकांच्या संख्येत कोणतीही घट झाली नाही. दादर, शिवाजी पार्क व परिसरात पांढर्‍या शुभ्र कपड्यांमधील अनुयायी व निळ्या झेंड्यांचे साम्राज्य पसरले होते. अशिक्षित शेतमजूर ते उच्चविद्याविभूषित अशा सर्व गटातील अनुयायी बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी रांगेत उभे होते. अनुयायांची गैरसोय होऊ नये, यासाठी मुंबई महापालिकेने चोख व्यवस्था केली होती. 

मुंबईची जीवनवाहिनी असलेल्या लोकलमध्ये अनुयायांची प्रचंड गर्दी झाली होती. सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास शासकीय हेलिकॉप्टरने चैत्यभूमीवर पुष्पवृष्टी करण्यात आली. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते कमला मेहता अंध शाळेच्या विद्यार्थिनींना भेटवस्तू देण्यात आल्या व भिक्खू संघाला चिवरदान करण्यात आले. मुख्यमंत्र्यांनी यावेळी काही अनुयायांची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला. चैत्यभूमीकडे जाणारा नेहमीचा मार्ग यंदा सुरक्षिततेच्या दृष्टीने बंद करण्यात आला होता व पर्यायी मार्गाने भीमसैनिकांना चैत्यभूमीकडे जाण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. 

पोलीस उपायुक्त डॉ. एस. एम. वाघमारे यांनी स्वतः चैत्यभूमीवर हजर राहून परिस्थितीचा आढावा घेतला.  देशाच्या विविध भागांतून आलेल्या भीमसैनिकांसाठी शिवाजी पार्क मैदानात व परिसरात विविध संस्थांनी भोजन, चहा व बिस्कीटवाटप करण्यात आले. विविध ठिकाणांहून आलेले  अनुयायी परतीच्या प्रवासाला लागल्याने दादर रेल्वे स्थानकामध्ये गर्दी झाली होती. बेस्टतर्फे कबूतरखाना ते चैत्यभूमी दरम्यान विशेष फेर्‍या चालवण्यात आल्या. प्रत्येक स्थानकात लोकल प्रवेश करताना व स्थानकातून बाहेर पडताना बाबासाहेब आंबेडकरांच्या जयजयकाराच्या घोषणा देण्यात येत होत्या.  दादर स्थानकात बाबासाहेब आंबेडकरांच्या जयजयकारासोबत शिवाजी महाराज, शाहू महाराजांचादेखील जयजयकार करण्यात येत होता. जब तक सुरज चांद रहेगा बाबा तेरा नाम रहेेगा, एकच साहेब बाबासाहेब अशा विविध घोषणा देण्यात येत होत्या.

ओखी चक्रीवादळामुळे कोणताही धोका उद्भवू नये यासाठी अनुयायांना समुद्रकिनार्‍यावर जाण्यास प्रतिबंध करण्यात आला होता. सुमारे दोन हजार पोलीस कर्मचारी व समता सैनिक दलाचे सुमारे सातशे सैनिक परिसरावर लक्ष ठेवून होते.