होमपेज › Mumbai-Thane-Raigad ›

भाजपचे मुंबईत उद्या शक्‍तिप्रदर्शन
 

भाजपचे मुंबईत उद्या शक्‍तिप्रदर्शन
 

Published On: Apr 05 2018 2:24AM | Last Updated: Apr 05 2018 2:07AMमुंबई : प्रतिनिधी

भाजपच्या स्थापना दिवसानिमित्त दि. 6 एप्रिल रोजी येथील बीकेसी मैदानावर भरणार्‍या महामेळाव्याची भाजपने जय्यत तयारी केली आहे. यासाठी राज्यभरातून 2 लाख 50 हजार प्रतिनिधी येतील, असे नियोजन करण्यात आले आहे. राज्याच्या 28 महत्त्वाच्या शहरांतून महामेळाव्याला येणार्‍या प्रतिनिधींसाठी विशेष रेल्वे सोडण्यात येणार आहेत. तर राज्याच्या कानाकोपर्‍यातून सुमारे 50 हजार वाहनांमधून प्रतिनिधी दाखल होणार  आहेत.

केंद्रात व राज्यातही सत्तेवर असलेल्या भाजपच्या कार्यकर्त्यांना लोकसभा निवडणूक जिंकण्यासाठी कामाला जुंपले जाणार आहे. बुथवाईज कार्यकर्त्यांची फळी उभारलेल्या भाजपने या सर्व कार्यकर्त्यांना भाजपची ताकद वाढविण्यासाठी पक्षकार्याला जुंपण्याचे  नियोजन केले आहे.

दुष्काळमुक्‍त महाराष्ट्र अशी घोषणा देऊन जलयुक्‍त शिवारच्या माध्यमातून जी गावे दुष्काळमुक्‍त करण्यात आली, त्याचा प्रचार व प्रसार भाजपकडून केला जात आहे. त्याचबरोबर महाराष्ट्रात शहरीकरणात झालेल्या वाढीच्या पार्श्‍वभूमीवर शहरी भागासाठी थेट नागरिकांना लाभ होईल व दृश्य स्वरूपात ठळकपणे दिसतील अशा योजनांसाठी राज्य सरकारने शंभर टक्के निधी देऊन योजना मार्गी लावण्याचे आदेश सर्व महापालिकांना दिले आहेत. पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी  पक्षाच्या कार्यकर्त्यांसाठी जास्त वेळ दिला असून, ते या महमेळाव्याच्या  माध्यमातून कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. पक्षाच्या स्थापना दिवसाच्या निमित्ताने भाजपने शक्‍तिप्रदर्शनाची जोरदार तयारी केली आहे. बीकेसीवर त्यासाठी सर्व सोयींनी सुसज्ज असा मंडप उभारण्यात आला आहे. त्याची गुरुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपचे मुंबई अध्यक्ष आशीष शेलार यांच्या समवेत पाहणी केली. 

शिवसेना-मनसेला उत्तर

शिवाजी पार्कवर शिवसेनेचा दसरा मेळाव्याच्या निमित्ताने दरवर्षी जोरदार शक्‍तिप्रदर्शन केले जाते. त्याला उत्तर म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेही गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर आपलाही मेळावा घेऊन शक्‍तिप्रदर्शन सुरू केले आहे. तर भाजपच्या वतीने बीकेसी मैदानावरील महामेळाव्याच्या आयोजनातून शिवसेना व मनसेला उत्तर देण्याची तयारी करण्यात आली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे व मुंबई प्रदेशचे अध्यक्ष आशीष शेलार यांनी बुधवारी या तयारीचा आढावा घेतला.