Sun, Apr 21, 2019 02:15होमपेज › Mumbai-Thane-Raigad › पालखीचे भोईच व्हायचे का?; भाजपमधील निष्ठावंतांची नाराजी

भाजपात इनकमिंग : राष्ट्रवादीतून पुरवठा सुरू!

Published On: May 24 2018 2:05AM | Last Updated: May 24 2018 2:05AMमुंबई : उदय तानपाठक

भारतीय जनता पक्ष सत्तेत आल्यापासून सातत्याने बाहेरून ‘इनकमिंग’ सुरू आहे आणि या नेत्यांना मानाची पदेही दिली जात आहेत. एकट्या राष्ट्रवादीच्याच सुमारे डझनभर आणि अन्य पक्षांतल्या तेवढ्याच नेत्यांनी गेल्या चार वर्षांत भाजपमध्ये येऊन पदे पटकावली असून, आता निरंजन डावखरे यांनाही पदवीधर मतदारसंघातून उमेदवारी दिली जाणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे भाजपचे निष्ठावंत कार्यकर्ते अस्वस्थ आहेत. आम्ही केवळ सतरंज्याच उचलायच्या काय, असा सवाल हे कार्यकर्ते करीत आहेत.

राष्ट्रवादीचे माजी प्रदेशाध्यक्ष बबनराव पाचपुते यांनी विधानसभेच्या निवडणुकीआधीच भाजपमध्ये प्रवेश केला आणि उमेदवारीदेखील मिळवली. त्यांचा पराभव झाला असला, तरी आज ते पक्षात महत्त्वाचे नेते झाले आहेत. नंदूरबारचे राष्ट्रवादीचे माजी मंत्री विजयकुमार गावित यांनी भाजपकडून विधानसभा निवडणूक लढवली आणि ते विजयी झाले, त्यांची मुलगी डॉ. हीना गावित यांना लोकसभेची उमेदवारी मिळाली आणि आता हे दोघेही आमदार-खासदार झाले आहेत. राष्ट्रवादीचे ठाणे जिल्ह्यातील नेते कपिल पाटील यांनीही भाजपकडून लोकसभा निवडणूक लढवली आणि आता पक्षाच्या निष्ठावंतांना त्यांना सलाम ठोकावा लागत आहे. राष्ट्रवादीचेच सांगलीचे आणखी एक नेते संजयकाका पाटील यांनी तर राष्ट्रवादीकडून आमदारकी भोगून लगेचच भाजपमध्ये प्रवेश केला आणि त्यांना खासदारकीची लॉटरीही लागली. आघाडी सरकारमध्ये राज्यमंत्री असलेल्या संजय सावकारे यांनी भाजपकडून विधानसभा निवडणूक लढवली. बीडचे राष्ट्रवादीचे नेते आणि राज्यमंत्री  सुरेश धस, विनायक मेटे, मुरबाडचे नेते किसन कथोरे, मंदा म्हात्रे, भारती लव्हेकर यांनी भाजपमध्ये आमदारकीची बक्षिशी मिळवली असून, आता निरंजन डावखरे यांनीही तोच मार्ग पत्करला आहे. डावखरे यांनाही पदवीधर मतदारसंघातून उमेदवारी दिली जाणार असल्याची चर्चा आहे. या उमेदवारीसाठी गेल्या काही महिन्यांपासून भाजपचे ठाणे जिल्हाध्यक्ष संदीप लेले प्रयत्नशील होते, त्यांनी मतदार नोंदणीदेखील जोरदार केली होती. 

आता त्यांना आणि अन्य इच्छुकांना डावखरे यांच्या प्रचाराची धुरा सांभाळावी लागण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीतून आलेले आणखी एक नेते प्रसाद लाड यांनाही विधान परिषदेची आमदारकी दिली गेली. इतकेच नव्हे, त्यांचे नाव आता मुंबई भाजपच्या अध्यक्षपदासाठी घेतले जात आहे. मनसेतून आलेल्या प्रवीण दरेकर यांना विधान परिषदेची आमदारकी दिली गेली, तर मनसेतून आयात झालेले आणखी एक नेते राम कदम हे तर पक्षाचे आमदार आणि प्रवक्‍ते झाले आहेत. नुकतीच क्‍लीन चिट मिळालेले काँग्रेसचे नेते कृपाशंकर सिंह हे भाजपमध्ये प्रवेशासाठी रांगेत उभे आहेतच.