Thu, Jun 27, 2019 13:42होमपेज › Mumbai-Thane-Raigad › भाजपच्या नाराजांची विरोधकांशी हातमिळवणी

भाजपच्या नाराजांची विरोधकांशी हातमिळवणी

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

मुंबई : विशेष प्रतिनिधी

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्यातील भाजप सरकारला घेरण्यासाठी भाजपमधील नाराज आणि विरोधकांनी हातमिळवणी करीत अराजकीय मंचाची स्थापना केली आहे. भाजपचे बंडखोर नेते यशवंत सिन्हा यांच्या नेतृत्वाखाली शनिवारी मुंबईतील दादर येथे झालेल्या बैठकीला काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांसह विविध क्षेत्रांतील 40 प्रमुख नेते उपस्थित होते. या बैठकीत पुरोगामित्व आणि शेतकरी बचावसाठी राज्यात आंदोलन सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याची सुरुवात 1 मे रोजी कोल्हापूर येथून होणार आहे.

नरेंद्र मोदी यांच्यावर नाराज असलेल्या यशवंत सिन्हा यांनी शेतकर्‍यांच्या प्रश्‍नांवर विदर्भात आंदोलन केले होते. ते पुढच्या काळात राज्यात अधिक सक्रिय होण्याचे संकेत आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली दादर येथील मनीलाईफ फाऊंडेशन येथे झालेल्या बैठकीला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, काँग्रेस खा. कुमार केतकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे आ. जितेंद्र आव्हाड, खा. अ‍ॅड. माजिद मेमन, भाजप आ. डॉ. आशिष देशमुख,  तुषार गांधी, प्रितीश नंदी, सुधींद्र कुलकर्णी, आभा सिंग, ‘आप’च्या नेत्या प्रीती मेनन आदी उपस्थित होते. या बैठकीत राज्यात भाजपविरोधात अराजकीय मंचाची स्थापना करण्याचा निर्णय घेण्यात आला.

केंद्र आणि राज्यातील भाजप सरकारमुळे देशातील लोकशाही आणि पुरोगामित्वाला धोका निर्माण झाल्याने पुरोगामी विचाराच्या लोकांनी एकत्र येत हा मंच स्थापन केल्याचे अ‍ॅड. माजिद मेनन यांनी या बैठकीनंतर सांगितले. देशातील मीडिया, न्यायसंस्थेला ताब्यात घेण्याचे सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. न्यायव्यवस्था दोन गटात विभागली असून सर्वोच्च न्यायालयालाही ताब्यात घेण्याचे प्रयत्न होत आहेत. त्यामुळे मोदी सरकार अधिक काळ सत्तेवर राहणे देशासाठी धोक्याचे असून, हे सरकार हटविण्यावरही या बैठकीत चर्चा झाल्याचे त्यांनी सांगितले.

या मंचाची कोअर टीम तयार करण्यात आली आहे. त्याचे निमंत्रक हे सुधींद्र कुलकर्णी असतील, तर आभा सिंग या सचिव आहेत. तसेच या टीममध्ये जितेंद्र आव्हाड, जिनत शौकत अली, सुचेता दलाल आणि डॉ. भारत पाटणकर यांचा समावेश आहे. एक मे रोजी कोल्हापूर येथे पुरोगामित्व बचाव यासाठी सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात येणार आहे. कॉ. गोेविंद पानसरे यांची ज्या ठिंकाणी हत्या झाली, तेथून हा मोर्चा काढण्यात येणार आहे. तर सात मे रोजी अकोल्यात शेतकर्‍यांच्या प्रश्‍नावर मोर्चा काढण्यात येणार आहे. तर, मुंबईत ऑगस्ट क्रांती मैदानातही सर्वपक्षीय सभा होणार आहे. या सभेची तारीख लवकरच ठरविण्यात येणार असल्याचे आ. जितेंद्र आव्हाड यांनी बैठकीनंतर स्पष्ट केले. या मंचाच्या माध्यमातून सर्व पुरोगामी पक्ष आपली राजकीय महत्त्वाकांक्षा बाजूला ठेवून मोदी हटावचा नारा देत एकत्र येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

राज्यातील शेतकरी आणि तरुणांच्या परिस्थितीवर या बैठकीत चर्चा झाली. शेतकरी नाडला गेला असताना नोकर्‍या नसल्याने तरुणांमध्येही नाराजी आहे. या मंचाच्या माध्यमातून शेतकरी आणि तरुणांच्या प्रश्‍नावरही संघर्ष करण्यात येणार असल्याचे आ. आशिष देशमुख म्हणाले.
 

Tags : BJP, angry, Involvement, with opponents, mumbai news


  •