होमपेज › Mumbai-Thane-Raigad › भाजपचे ऑपरेशन राष्ट्रवादी; नरेंद्र पाटील, सचिन अहिर, संजय पाटील रांगेत?

भाजपचे ऑपरेशन राष्ट्रवादी; नरेंद्र पाटील, सचिन अहिर, संजय पाटील रांगेत?

Published On: May 25 2018 11:32AM | Last Updated: May 25 2018 11:23AMमुंबई : उदय तानपाठक

भाजपात प्रवेश घेण्यासाठी अन्य पक्षांतील अनेक नेते रांगेत उभे असून लवकरच ते दिसून येईल, असे विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. सध्यातरी भाजपाने राष्ट्रवादीवर लक्ष केंद्रित केले असून त्या पक्षाचे किमान तीन महत्त्वाचे नेते भाजपाच्या प्रवेशेच्छुकांच्या रांगेत उभे असल्याचे समजते. मुंबईत आगामी काळात शिवसेनेशी टक्कर घेण्यासाठी या नेत्यांवर जाळे टाकण्यात आले असून त्यात राष्ट्रवादीचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांचाही समावेश आहे.

निरंजन डावखरे यांना प्रवेश देताना आणखी नेत्यांची रांगच भाजपात येण्यासाठी लागली असल्याचे विधान मुख्यमंत्र्यांनी केले होते. मुख्यमंत्र्यांच्या या विधानाच्या तासभर आधीच राष्ट्रवादीचे आमदार आणि माथाडींचे नेते नरेंद्र पाटील भाजपा कार्यालयापर्यंत निरंजन डावखरे यांची पाठराखण करण्यासाठी आले होते. नंतर ते तेथून निघून गेले, मात्र ते या रांगेत उभे असल्याचे डावखरे यांचेच काही सहकारी सांगत होते.

माथाडी कामगार आणि मराठा मोर्चाच्या मागण्या पूर्ण होत असतील, तर आपण भाजपाचा विचार करू शकतो असे नरेंद्र पाटील यांनी अनौपचारिकरित्या बोलताना सांगितले. पाटील हे काही महिन्यांआधीच भाजपात जाण्यास निघाले होते, मात्र शरद पवारांनी झापल्यानंतर त्यांनी माघार घेतली होती. नरेंद्र हे विधान परिषदेचे सदस्य असून त्यांची आमदारकी जुलैमध्ये संपत आहे. आता त्यांना पुन्हा एकदा विधान परिषदेची आमदारकी दिली जाईल, अशी शक्यता आहे. तशी ऑफरही त्यांना दिली गेली असून महिन्याभरातच ते ही ऑफर स्वीकारतील अशी शक्यता आहे. राष्ट्रवादीचे दुसरे महत्त्वाचे नेते माजी राज्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे मुंबईचे अध्यक्ष सचिन अहिर यांनाही पक्षात घेण्यासाठी भाजपाने गळ टाकला असून ते त्या गलाला लागण्याची शक्यता असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. अहिर यांचा मध्य मुंबईत बर्‍यापैकी प्रभाव असून वरळीतून त्यांना उमेदवारी दिली जाईल, अशी शक्यता आहे.

राष्ट्रवादीचे माजी खासदार आणि माजी मुंबई अध्यक्ष संजय दिना पाटील यांचाही या रांगेत समावेश असल्याची चर्चा आहे. संजय दिना पाटील हे मुलुंड-भांडुप परिसरातील प्रभावशाली नेते समजले जातात. आगरी समाजातही त्यांच्या कुटुंबाचा प्रभाव आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात त्यांचा भाजपाला उपयोग होऊ शकतो. याखेरीज शिवसेना आणि काँग्रेसच्या काही नेत्यांनाही पावन करून भाजपात घेण्याचा विचार सुरू झाला असून आगामी काही दिवसांतच हा प्रवेश महोत्सव सुरू होईल, असे म्हणतात.