Fri, Feb 22, 2019 09:27होमपेज › Mumbai-Thane-Raigad › भाजप कार्यकर्त्यांच्या वाहनांची तोडफोड

भाजप कार्यकर्त्यांच्या वाहनांची तोडफोड

Published On: Dec 13 2017 2:36AM | Last Updated: Dec 13 2017 1:40AM

बुकमार्क करा

शहापूर/डोळखांब : वार्ताहर 

शहापूर तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी आज बुधवारी मतदान प्रक्रिया पार पडत आहे. मात्र, सोमवारी या निवडणुकीच्या प्रचाराच्या शेवटच्या दिवशी डोळखांब भागात मतदारांना पैसे वाटायला गेलेल्या भाजपा कार्यकर्त्यांच्या वाहनांची स्थानिक नागरिकांनी तोडफोड करून त्यांना पळवून लावले. यात पनवेलचे भाजपचे आ. प्रशांत ठाकुर यांना मारहाण केल्याचे वृत्त आहे. मात्र, या वृत्ताचा आ. ठाकुर यांनी इन्कार केला आहे. 

सोमवारी (दि. 11) रात्री डोळखांब परिसरातील साकडबाव जिल्हा परिषद गटात चिल्लारवाडी जवळील गिर्‍याची वाडी येथे आ. प्रशांत ठाकूर हे भाजपा उमेदवारांसाठी दादागिरी करून पैसे वाटप करत असताना स्थानिक ग्रामस्थांनी त्याला विरोध केला. तेव्हा आ. ठाकूर यांचे सहकारी कार्यकर्ते व ग्रामस्थ यांच्यात झटापट झाली. यात ठाकूर यांच्या ताफ्यातील वाहनांची तोडफोड करत आमदार, पनवेल महापालिकेचे नगरसेवक व कार्यकर्त्यांना मारहाण झाल्याचे वृत्त मंगळवारी दिवसभर सोशल मीडियावर व्हायरल होत होते.

आ. प्रशांत ठाकूर यांनी मात्र या वृत्ताचा इन्कार केला आहे. राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपूर येथे सुरू असतानाही भाजपाचे बहुतांश आमदार व मंत्री स्थानिक प्रश्न विधानसभेत मांडण्याऐवजी शहापूर व मुरबाडच्या ग्रामीण भागात प्रचारात व्यस्त असल्याने आश्चर्य व्यक्त केलेे जात आहे. दरम्यान, तोडफोड झालेली सर्व वाहने प्रादेशिक परिवहन विभागाच्या पनवेल कार्यालयातून क्रमांक नोंदणी झालेली असल्याचे समजते.