Fri, Mar 22, 2019 08:40



होमपेज › Mumbai-Thane-Raigad › महाराष्ट्र स्टेट हौसिंग फायनान्स कॉर्पोरेशनमध्ये भाजपची दमदार 'एन्ट्री'

महाराष्ट्र स्टेट हौसिंग फायनान्स कॉर्पोरेशनमध्ये भाजपची दमदार 'एन्ट्री'

Published On: Jul 04 2018 9:18PM | Last Updated: Jul 04 2018 9:18PM



मुंबई : पुढारी वृत्तसेवा

महाराष्ट्र स्टेट को -ऑप हौसिंग फायनान्स कॉर्पोरेशनच्या रविवारी झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसच्या वर्चस्वाला धक्का देत भाजपाप्रणित सहकार पॅनेलने दमदार एन्ट्री के ली. राज्य सहकारी संघावर वर्चस्व प्रस्थापित केल्यानंतर, मुंबई बँकेचे अध्यक्ष आमदार प्रवीण दरेकर यांच्या नेतृत्वाखाली सहकार पॅनेलने या आणखी एका शिखर संस्थेत शिरकाव केल्यामुळे सहकार क्षेत्रात भाजपने जोरदार आगेकूच सुरू ठेवलेली दिसते. 

सहकार पॅनेलचे नाशिक विभागातून आमदार बाळासाहेब सानप, माजी आमदार वसंत गिते बिनविरोध, तर निवडणुकीत मुंबई विभागातून सीताराम बाजी राणे, दत्तात्रय शामराव वडेर आणि नागपूर विभागातून राकेश मुकुंदराव पन्नासे विजयी झाले आहेत. 

महाराष्ट्र स्टेट हौसिंग फायनान्स कॉर्पोरेशनवर आतापर्यंत काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे अखंडीत वर्चस्व होते.  हे वर्चस्व कायम ठेवण्यासाठी दोन्ही काँग्रेसनी आघाडी केली होती. या आघाडीचे नेतृत्त्व राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अजित पवार, जयंत पाटील, तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण या दिग्गज नेत्यांनी केलेे. तरीही बड्या नेत्यांच्या या आघाडीला भाजपने शह दिलाच.  काँग्रेसच्या आघाडीविरुद्ध निवडणूक लढवताना खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष घातले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार प्रवीण दरेकर, आमदार बाळासाहेब सानप, माजी आमदार वसंत गिते आणि सहकारातील जेष्ठ नेते शिवाजीराव नलावडे यांच्या नेतृत्वाखाली सहकार पॅनेल स्थापन करण्यात आले होते. या भाजपप्रणित सहकार पॅनेलने जोरदार यश मिळवीत,  21 पैकी 5 जागा पटकावत सहकार पॅनेलचा हौसिंग फायनान्स कॉर्पोरेशनमध्ये प्रवेश झाला.

या निवडणुकीत काँग्रेस -राष्ट्रवादी आघाडीला 16 जागांवर अत्यल्प मताने विजय मिळाला. के वळ 200 मतांचा फरक आहे. त्यापैकी 100 मते जरी सहकार पॅनेलला मिळाली असती तर चित्र बदलले असते. तरीही या संस्थेवरील काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे वर्चस्व पाहता,  सहकार पॅनेलला मिळालेले यश  मोठे आहे. राज्यातील सर्व मतदारांचे आम्ही आभारी असल्याचे आमदार दरेकर यांनी सांगितले.