होमपेज › Mumbai-Thane-Raigad › काँग्रेस-राष्ट्रवादी-सेना एकत्र आले तरी भाजपच जिंकेल : अमित शहा

काँग्रेस-राष्ट्रवादी-सेना एकत्र आले तरी भाजपच जिंकेल : अमित शहा

Published On: Jul 23 2018 1:22AM | Last Updated: Jul 23 2018 1:18AMमुंबई : प्रतिनिधी 

भाजपाविरोधात एकत्र येण्याची तयारी काँग्रेस व अन्य पक्षांनी चालवली आहे. महाराष्ट्रात काँग्रेस-राष्ट्रवादी हे दोन पक्ष एकत्र येतील. शिवसेनेची निश्‍चित भूमिका काय असेल माहीत नाही; मात्र काँग्रेस-राष्ट्रवादी आणि सेना हे तिन्ही पक्ष मिळून जरी लढले तरी 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाचाच उमेदवार विजयी होईल, अशी तयारी प्रत्येक मतदारसंघात करावी, अशा सूचना भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. अमित शहा यांनी मुंबईत रविवारी झालेल्या भाजपच्या बैठकीत दिल्याचे सूत्रांनी सांगितले.

लोकसभा निवडणुकीची पूर्वतयारी म्हणून अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक मुंबईत पार पडली. वसंत स्मृती कार्यालयात  झालेल्या या बैठकीस प्रदेश अध्यक्ष रावसाहेब दानवे, केंद्रीय .  मंत्री नितीन गडकरी, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, शिक्षणमंत्री विनोद तावडे, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्यासह महाराष्ट्रातील प्रदेश पदाधिकारी, संघटक आणि विस्तारक उपस्थित होते. प्रत्येक बुथवर 51 टक्के मते भाजपाला कशी मिळतील हे उद्दिष्ट समोर ठेवून तयारीला सुरूवात करा.

ढिसाळपणा खपवून घेतला जाणार नाही, असे शहा यांनी बजावल्याचे कळते. लोकसभा निवडणूक जवळ आली असून कोणत्याही परिस्थितीत देशात पुन्हा भाजपाची सत्ता यावी, यासाठी आतापासूनच तयारीला लागा. निवडणुकीत कोण सोबत येतय आणि कोण नाही? याचा विचार करत राहू नका. जी परिस्थिती असेल त्या परिस्थितीत महाराष्ट्रातून भाजपाचे जास्तीत जास्त खासदार निवडून कसे येतील,  यादृष्टीने संघटनात्मक बांधणी करा, असे आदेश त्यांनी दिले.

एकदा जिंकलो म्हणून दुसर्‍यांदा निवडणुकीत सहज जिंकता येईल, असे नाही. ज्या मतदारसंघात भाजपाचे खासदार, आमदार आहेत, तेथील परिस्थितीचा अंदाज घेऊन संघटना म्हणून आपण कुठे कमी पडत असल्यास कामगिरी सुधारण्यावर भर देण्यात यावा. सरकारने केलेली कामे मतदारसंघातील लोकांपर्यंत पोहचवा. अन्य पक्षातील छोट्या मोठ्या घडामोडींवर लक्ष देण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.