होमपेज › Mumbai-Thane-Raigad › सावज टप्प्यात आल्यावर बार उडवणार

सावज टप्प्यात आल्यावर बार उडवणार

Published On: Jul 24 2018 1:08AM | Last Updated: Jul 24 2018 12:51AMमुंबई : विशेष प्रतिनिधी

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या प्रसिद्ध झालेल्या टीकेचा सारा रोख हा मित्रपक्ष भाजवरच आहे. आपण सावज टप्प्यावर आल्यानंतर बार उडविणार असल्याचा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला आहे. मात्र, सत्तेत बाहेर पडण्याबाबत त्यांनी मौन बाळगले आहे. सत्तेत राहून जनतेच्या प्रश्‍नावर विरोध करीत राहाण्याचेच संकेत त्यांनी या मुलाखतीत दिले आहेत. 

उद्धव ठाकरे यांची दै. सामनामध्ये मॅरेथॉन मुलाखत प्रसिद्ध होणार असून या मुलाखतीचा पहिला भाग हा सोमवारी प्रसिद्ध झाला. या मुलाखतीत उद्धव ठाकरे यांनी भाजपवरच निशाणा साधला आहे. सरकारवर अंकुश ठेवण्याचे काम शिवसेना करीत आहे. ज्या गोष्टी गोरगरीब जनतेच्या हिताच्या नाहीत, देशाच्या हिताच्या नाहीत असे आम्हाला वाटते, तिथे सत्तेत असलो तरी आम्ही विरोध करणारच असे ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे. दुसर्‍याची बंदूक मी माझ्या खांद्यावर ठेवून देणार नाही. माझ्या हातात बंदूक आहे. बंदुकीचा बार नक्की उडणार मात्र सावज टप्प्यात आल्यानंतर बार उडवायचा असतो, असे सांगतानाच काहीवेळा सावजाला गोळी मारण्याचीही गरज नाही, ते पळून पळून पण पडू शकेल, असा इशारा त्यांनी दिला. 

आपल्या हातात जेवढी सत्ता आहे तेवढी आम्ही लोकांसाठी वापरत आहोत. सरकारवर अंकुश ठेवून कर्जमुक्ती करायला लावली, शिवसेनेच्या दबावामुळेच मुंबईसह राज्यातील 27 महापालिकांना जीएसटीत महसूल सुरक्षित झाला असल्याचा दावा करतानाच सत्तेतून बाहेर पडण्याबाबत उत्तर देणे टाळतानाच आपण वेगळी नीती आखल्याचे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे.