Thu, Dec 12, 2019 23:47होमपेज › Mumbai-Thane-Raigad › युती होईलच, कामाला लागा : चंद्रकांत पाटील

युती होईलच, कामाला लागा : चंद्रकांत पाटील

Published On: Jul 22 2019 2:06AM | Last Updated: Jul 22 2019 2:06AM
मुंबई : विशेष प्रतिनिधी

आगामी विधानसभा निवडणुकीत भाजप आणि मित्रपक्ष किमान 220 जागा जिंकतील, असा दावा  प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी रविवारी केला. जेथे मित्रपक्षांचा उमेदवार निवडणूक लढवत असेल तो भाजपचाच समजून कार्यकर्त्यांनी कामाला लागावे, असा आदेशही त्यांनी दिला. शिवसेनेबरोबर युती होणारच आहे. पक्षाध्यक्ष अमित शहा योग्यवेळी निर्णय जाहीर करतील; मात्र त्यासाठी न थांबता कामाला लागा, असे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले.

गोरेगाव येथील मुंबई प्रदर्शन केंद्रात झालेल्या भाजपच्या विशेष कार्य समितीच्या बैठकीत ते बोलत होते. प्रदेशाध्यक्षपदाची धुरा हाती घेतल्यानंतर पाटील यांचे पदाधिकार्‍यांना संबोधित करणारे हे पहिलेच जाहीर भाषण होते. त्यामुळे पक्षाच्या कार्यकर्त्यांसह इतर राजकीय पक्षांच्या नेत्यांचेही त्यांच्या भाषणाकडे लक्ष लागले होते. ‘अब की बार 220 पार’ असा संदेश त्यांनी कार्यकर्त्यांना दिला.

पाटील म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची अफाट लोकप्रियता, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी बळकट केलेली पक्ष संघटना आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारची यशस्वी कामगिरी या आपल्यासाठी जमेच्या बाजू आहेत. त्याच्या आधारावरच लोकसभा निवडणुकीत जनतेने आपल्याला कौल दिला आहे. आगामी विधानसभा निवडणुकीतही त्याची पुनरावृत्ती होईल. सध्या युतीबाबत काही वावड्या उठवल्या जात आहेत; पण युतीचा निर्णय भाजप अध्यक्ष अमित शहा  आणि मुख्यमंत्री फडणवीस योग्यवेळी जाहीर करतील. मात्र, त्याची वाट न पाहता आपण सर्वांनी ताकदीनिशी कामाला लागले पाहिजे.

संघटना संख्यात्मक वाढत आहे, आता गुणात्मकवाढ करायची आहे. गेल्या पाच वर्षांत 50 हजार कोटींपेक्षा जास्त रक्कम शेतकर्‍यांच्या खात्यांवर जमा झाली, त्यामुळे आपला शेतकरी भाजप विरोधात जाणार नाही. सध्या एक कोटी सहा लाख सदस्य आहेत, आगामी विधानसभेसाठी आणखी 50 लाखांनी सदस्यता वाढवायची आहे. याआधारे ‘अब की बार 220 पार’ शक्य आहे. त्यामुळे घाबरलेले काँग्रेस -राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आले आहेत, असे चंद्रकांत पाटील म्हणाले.

कार्यकर्त्यांना सुनावले खडे बोल

प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आपल्या भाषणात कार्यकर्त्यांना खडे बोल सुनावले. आपल्या पक्षात 122 पैकी इतर पक्षांतील 20 ते 22 जण नवीन आले असले, तरीही पार्टी प्रत्येकाला त्याच्या गुणाप्रमाणे काम देते. त्यामुळे मोबाईलमध्ये फोटो काढायचे आधी बंद करा. काहीजण येतात आणि फक्त फोटो काढून मतदारसंघात हजेरी लावली, हे दाखवायला मोकळे होतात. आता बैठकीला आलात तर पूर्ण वेळ थांबा. निघायचे असेल तर माझी परवानगी घ्या. आता प्रदेशाध्यक्ष म्हणून अद़ृश्य काठी माझ्या हातात आली आहे, हे विसरू नका, असे त्यांनी सांगितले.

सुप्रिया सुळे कशा विजयी झाल्या?

चंद्रकांत पाटील यांनी आपल्या भाषणात काँग्रेस-राष्ट्रवादीला खडे बोल सुनावले. ते म्हणाले, काँग्रेसला सत्तर वर्षांत जे जमले नाही, ते पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री फडणवीस यांनी करून दाखवले. पंतप्रधानांनी रेल्वेमधील शौचालये बायोटॉयलेटयुक्त करून क्रांती घडवली, तर मुख्यमंत्र्यांनी ‘स्वच्छ वारी, निर्मल वारी’ मोहीम राबवली. वारकर्‍यांना पाच लाख रेनकोट देऊन त्यांची सोय केली. काँग्रेस आणि राष्ट्रवादीला हे का नाही जमले. ईव्हीएमबद्दल दोन्ही काँग्रेसने शंका घेतली आहे. मग बारामतीत सुप्रिया सुळे कशा विजयी झाल्या, असा सवालही पाटील यांनी उपस्थित केला.