Sat, May 30, 2020 05:35होमपेज › Mumbai-Thane-Raigad › शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात भाजपाची पेरणी सुरू!

शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात भाजपाची पेरणी सुरू!

Published On: Aug 10 2018 1:38AM | Last Updated: Aug 10 2018 1:20AMमुंबई : राजेश सावंत 

मुंबईत विधानसभा निवडणूकीचे पडघम वाजू लागले आहेत. यावेळी मुंबईत सर्वाधिक जागा जिंकण्यासाठी मुंबई भाजपाने शिवसेनेचे वर्चस्व असलेल्या बालेकिल्ल्यात आतापासूनच पेरणी करण्यास सुरूवात केली आहे. गुरूवारी शिवसेनेच्या दिंडोशी विधानसभा मतदार संघात भाजपाचे मुंबई अध्यक्ष अ‍ॅड. आशिष शेलार यांनी जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन करून नारळ फोडला आहे. 

शिवसेना व भाजपातील अंतर्गत वाद लक्षात घेता, यावेळीही विधानसभा निवडणूकीत दोघेही स्वतंत्रपणे निवडणूक लढवणार असल्याचे निश्‍चित झाले आहे. मुंबईत विधानसभेच्या 36 मतदार संघांपैकी  15 जागांवर भाजपाचे आमदार आहेत. तर 14 मतदार संघात शिवसेनेचे आमदार आहेत. 2014 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणूकीत दिंडोशी, चेंबूर, भांडूप व अन्य 4 मतदार संघात भाजपाचा निसटता पराभव झाला होता. त्यामुळे या मतदार संघासह शिवसेनेच्या आमदार असलेल्या अन्य मतदार संघाकडे विशेष लक्ष देण्याचा निर्णय मुंबई भाजपाने घेतला आहे. याचा शुभारंभ गुरूवारी दिंडोशी मतदार संघातून झाला आहे. दिंडोशी विधानसभा मतदार संघातील शिवसेनेच्या वर्चस्वाला लगाम घालण्यासाठी भाजपाने काँग्रेसचे माजी आमदार राजहंस सिंह यांना गळाला लावले. या मतदार संघातून सिंह एकवेळा विधानसभेत गेल्यामुळे भाजपाने सिंह यांना पुन्हा शिवसेनेच्या विरोधात रिंगणात उतरवण्याचा निर्णय घेतला आहे.याचाच एक भाग म्हणून गुरूवारी राजहंस सिंह यांच्या त्रिवेणी नगर येथीलजनसंपर्क कार्यालयाचे  उद्घाटन करण्यात आले. 

 2014 मध्ये दिंडोशी मतदार संघातून शिवसेनेचे माजी महापौर सुनिल प्रभू निवडून आले होते. प्रभू यांनी भाजपाच्या मोहित कंबोज व काँग्रेसच्या राजहंस सिंह यांचा पराभव केला होता. 

भाजपाने कंबोज यांना निवडणूक रिंगणात उतरवल्यामुळे येथील उत्तर भारतीय मतदारांमध्ये विभागणी झाली. त्यामुळे प्रभू यांचा तब्बल 20 हजार मतांनी विजय झाला होता. या निवडणूकीत प्रभू यांना 56 हजार 517, सिंह यांना 36 हजार 749 व कंबोज यांना 36 हजार 169 मते मिळाली होती. पण यावेळी सिंह भाजपातून निवडणूक लढवणार असल्यामुळे शिवसेनेसाठी तो धोका आहे.

दिंडोशीनंतर भांडूप विधानसभा मतदार संघाकडे भाजपाने आपले लक्ष केंद्रीत केले आहे. 2014 मध्ये झालेल्या निवडणूकीत भाजपाचे उमेदवार नगरसेवक मनोज कोटक यांचा निसटता पराभव झाला होता. त्यामुळे या मतदार संघात भाजपाचा प्रभाव वाढवण्यासाठी काँग्रेसच्या दिवंगत नगरसेविका प्रमिला पाटील यांच्या कुटुंबाला भाजपात प्रवेश देऊन हा मतदार संघ भाजपाने बांधला आहे.