होमपेज › Mumbai-Thane-Raigad › लोकसभेसाठी भाजपची चाचपणी सुरू; IBकडे सोपवली जबाबदारी

लोकसभेसाठी भाजपची चाचपणी सुरू; IBकडे सोपवली जबाबदारी

Published On: May 20 2018 1:43AM | Last Updated: May 20 2018 1:43AMमुंबई : राजेश सावंत

कर्नाटक विधानसभा निवडणुकीत बहुमतापासून दूर राहिलेल्या भाजपने चांगलाच धसका घेतला आहे. वर्षभरावर येऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीत याचा फटका बसू नये, म्हणून केंद्रातील भाजप सरकारने लोकसभा मतदारसंघातील आपली ताकद आजमावण्यासाठी चाचपणी सुरू केली आहे. यासाठी केंद्रीय गुप्‍तवार्ता (आयबी) विभाग व राज्याच्या गुप्‍तवार्ता विभागाकडे जबाबदारी सोपवण्यात आली असल्याचे समजते.

गुजरात विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा वाढलेला प्रभाव व कर्नाटक निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जाहीर सभा होऊनही मतदारांनी भाजपला बहुमतापासून दूर ठेवले आहे. एवढेच नाही तर, मतांची टक्केवारीही काँग्रेसपेक्षा कमी आहे. त्यामुळे येत्या वर्षभरात होणारी लोकसभा निवडणूक भाजपसाठी सोपी राहिलेली नाही. त्यामुळे देशातील कोणत्या लोकसभा मतदारसंघात भाजपचा प्रभाव कमी पडेल. याचा शोध घेण्यास भाजपने सुरुवात केली आहे. यासाठी सरकारी यंत्रणा कामाला लावल्याचे बोलले जात आहे.

लोकसभा निवडणुकीसह महाराष्ट्रात विधानसभा निवडणूकही होणार आहे. त्यामुळे भाजपने महाराष्ट्राकडे आपले लक्ष केंद्रित केले आहे. राज्यातील 48 लोकसभा मतदारसंघांसह 288 विधानसभा मतदारसंघांचा अहवाल तयार करण्याचे काम सुरू आहे. यासाठी भाजपने विद्यमान खासदार व आमदार यांच्यासह राज्यातील वरिष्ठ नेत्यांकडे जबाबदारी सोपवण्याचा निर्णय घेतला आहे. 

मुंबईतील सहा लोकसभा मतदारसंघांसह 36 विधानसभा मतदारसंघांत चाचपणी सुरू झाली आहे. केंद्रीय गुप्तवार्ता विभागाचे कर्मचारी प्रत्येक लोकसभा व विधानसभा मतदारसंघनिहाय माहिती गोळा करत आहेत. यात मतदारांची संख्या किती, यात उत्तर भारतीय, मुस्लीम, मराठी, गुजराती, दक्षिण भारतीय मतदारांची माहिती जमा करण्यात येत आहे. एवढेच नाही तर कोणत्या विभागात शिवसेना व काँग्रेस या प्रमुख पक्षांचे वर्चस्व आहे. हे वर्चस्व कमी करण्यासाठी काय करावे लागेल, याचा अभ्यास सुरू आहे.