Fri, Jul 19, 2019 20:37होमपेज › Mumbai-Thane-Raigad › ‘फडणवीसच मुख्यमंत्री; दुकाने बंद झाल्याने नेतृत्वबदलाच्या चर्चेचे उपद्व्याप’

‘फडणवीसच मुख्यमंत्री; दुकाने बंद झाल्याने नेतृत्वबदलाच्या चर्चेचे उपद्व्याप’

Published On: Jul 26 2018 1:35AM | Last Updated: Jul 26 2018 8:28AMमुंबई : खास प्रतिनीधी

मराठा आरक्षणावरून राज्यात निर्माण झालेली परिस्थिती हाताळण्यात सरकारला अपयश आले असून मुख्यमंत्री बदलाची चर्चा भाजपात सुरू झाली असल्याचा दावा शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी केला आहे. राऊत यांच्या या दाव्याचे दोन मंत्र्यांनी खंडन केले असून अशी कोणतीही चर्चा सुरू असल्याचा साफ इन्कार केला आहे. कुणाची तरी दुकाने बंद झाल्यानेच ही चर्चा सुरू झाल्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे.  

मराठा आरक्षणावरून राज्यभर आंदोलनाचा वणवा पेटला असताना शिवसेनेने पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांना टार्गेट केले आहे. त्यातच मुख्यमंत्री बदलाची चर्चा भाजपात सुरू असल्याचे खळबळजनक विधान शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केले. राज्यातील परिस्थिती चिंताजनक असून परिस्थितीला तोंड देण्यात सरकारच्या नाकी नऊ आले आहे. त्यामुळे भाजपमध्ये मुख्यमंत्री बदलाची चर्चा सुरु झाल्याचा दावा संजय राऊत यांनी केला आहे.

निर्णय भाजपाचे श्रेष्ठीच घेतील!   

मुख्यमंत्री बदलायचा झाल्यास त्यासंबंधीचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपध्यक्ष अमित शाह हेच घेतील. मात्र, पंतप्रधान सध्या परदेशात आहेत. मुख्यमंत्री बदलाची चर्चा फक्त राजकीय वर्तुळात नाही तर भाजपामध्येही सुरु आहे असेही राऊत यांनी म्हटले आहे. 

राऊत यांनी हे विधान करताच महसूल मंत्री चंद्रकांत पाटील आणि अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी त्याचे खंडन केले आहे. भाजपामध्ये सर्व निर्णय सामूहिक होत असतात आणि मुख्यमंत्री बदलाची इथे कोणतीही चर्चा नाही असे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले आहे. 

राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनीही ही शक्यता पूर्णपणे फेटाळून लावत मुख्यमंत्री बदलण्याचे कारणच काय ? असा सवाल केला. मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी आपल्यापेक्षा मुख्यमंत्री अधिक प्रयत्नशील असून ते यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करीत असल्याचे पाटील यांनी म्हटले आहे. 

राज्यात नेतृत्वबदलाची मुळीच गरज नसून कुणाची तरी दुकाने बंद केल्यानेच हे असले चर्चेचे उपद्व्याप सुरु असल्याचे पाटील म्हणाले. ब्राह्मण मुख्यमंत्री नको, असं कोणाच्याच मनात नाही, असाही निर्वाळा त्यांनी दिला.