Thu, Jul 18, 2019 02:04होमपेज › Mumbai-Thane-Raigad › लोकसभेसाठी भाजपची ‘क्‍लस्टर’ व्यूहरचना 

लोकसभेसाठी भाजपची ‘क्‍लस्टर’ व्यूहरचना 

Published On: Aug 29 2018 1:43AM | Last Updated: Aug 29 2018 1:07AMमुंबई : दिलीप सपाटे 

लोकसभा निवडणुक जिंकण्यासाठी यावेळी केंद्रीय भाजपने क्‍लस्टर व्यहरचना आखली आहे. तीन ते चार लोकसभा मतदारसंघाचा एक क्‍लस्टर तयार करण्यात आला असून या क्‍लस्टरच्या जबाबदार्‍याही निश्‍चित करण्यात आल्या आहेत. महाराष्ट्रात 48 मतदारसंघाचे एकूण 17 क्‍लस्टर तयार करण्यात आले आहेत. स्वबळावर लढावे लागेल हे गृहीत धरुन राज्यभर क्‍लस्टरची बांधणी सुरु करण्यात आली आहे. 

असल्याचे लोकसभा निवडणुकांना आता फारसा अवधी राहीलेला नसून केंद्रात दुसर्‍यांदा सरकार स्थापन करण्यासाठी भाजपने देशभर जोरदार मोर्चेबांधणी सुरु केली आहे. भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी 2014 च्या निवडणुकीत बूथ स्तरावर रणनीती राबविली होती. बूथ रचना पूर्ण झाल्यानंतर आता यावेळी लोकसभा निवडणूक जिंकण्यासाठी वेगळ्या पध्दतीने नियोजन सुरु केले आहे. एका मतदारसंघाचा विचार न करता विरोधकांना नामोहरम करण्यासाठी एकत्रितरित्या तीन ते चार लोकसभा मतदारसंघाची व्युहरचना तयार करण्याच्या सुचना राज्यांना दिल्या आहेत. या योजनेला क्‍लस्टर असे नाव देण्यात आले आहे. त्यानुसार महाराष्ट्रातही भाजपने क्‍लस्टरची उभारणी सुरु केली आहे. 

पुणे आणि सोलापूर कल्स्टरची बैठक मंगळवारी पार पडली. पुणे क्‍लस्टरमध्ये पुणे, शिरुर आणि बारामती लोकसभा मतदारसंघाचा समावेश आहे. तर सोलापूर क्‍लस्टरमध्ये सोलापूर आणि माढा मतदारसंघांचाही समावेश आहे. याशिवाय कोल्हापूर, हातकणंगले, सांगली आणि सातारा या चार लोकसभा मतदारसंघाचा समावेश आहे. भौगोलिक परिस्थितीचा विचार करुन क्‍लस्टरची रचना करण्यात आली आहे. या क्‍लस्टरला प्रमुख आणि प्रभारी नेताही नेमण्यात आला असून विविध जबाबदार्‍याही निश्‍चित करण्यात येत आहेत. पश्‍चिम महाराष्ट्रातील तीनही क्‍लस्टरची जबाबदारी ही इचलकरंजीचे आमदार सुरेश हाळवणकर यांच्यावर देण्यात आल्याचे समजते. राज्यातील अन्य भागातही क्‍लस्टरची रचना करुन जबाबदार्‍या देण्यात आल्या आहेत.