भाजपचे आंदोलन महाराष्ट्राशी द्रोहच : ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ

Last Updated: May 23 2020 1:03AM
Responsive image


कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा 
उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यापासून देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील अस्वस्थ आहेत. त्यामुळे ते महाविकास आघाडी सरकार विरोधात सातत्याने राजकारण करत आहेत. त्यांचे आजचे आंदोलन म्हणजे महाराष्ट्राशी द्रोह आहे, अशा शब्दांत ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी भाजपच्या आंदोलनावर टीका केली.

आधी टाळ्या, नंतर दिवे  आणि आता काळे झेंडे हा सर्व प्रकार म्हणजे कोरोनाविरोधात गेल्या दोन महिन्यांपासून लढणार्‍या डॉक्टर, नर्सेस, पॅरामेडिकल स्टाफ, पोलिस, शासकीय कर्मचारी या सर्वांचा अपमानच आहे, असेही मंत्री मुश्रीफ म्हणाले.

राज्य शासनाने केंद्र सरकार पूर्वीच राज्यात पहिला लॉकडाऊन केला होता. मात्र, मध्य प्रदेशच्या राजकारणासाठी केंद्र सरकारने संपूर्ण देशात उशिरा  लॉकडाऊन जाहीर केला. परिणामी, 35 लाख लोक परदेशातून भारतात आले. हा कशाचा परिणाम आहे, असा सवाल करीत राज्यातील तसेच देशातील कोरोनाच्या प्रसाराला केंद्र सरकार जबाबदार असल्याचा अप्रत्यक्ष आरोपही मंत्री मुश्रीफ यांनी केला.

मुंबई देशाचे महाद्वार आहे. यामुळे मुंबईत येणार्‍यांची संख्या प्रचंड आहे. मुंबईत देशातील सर्वात मोठे कोरोना केअर सेंटर उभे राहत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे संयमाने, धीराने सर्व परिस्थिती उत्तमपणे हाताळत आहेत; मात्र ते घराबाहेर पडत नाही म्हणून टीका केली जाते, मग देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी पीपीई किट घालून कुठे फिरले? पंतप्रधान म्हणून त्यांची जबाबदारी नव्हती का, असा प्रतिसवालही मुश्रीफ यांनी केला. कोरोनाचे संकट जगातील  दोनशे राष्ट्रात आहे. हे अचानकपणे आलेले संकट आहे.   हे सर्व भाजपला माहित आहे.अशा परिस्थितीत  सरकारला  सहकार्य करायला हवे होते.  सूचना करायला पाहिजे होत्या. मात्र त्याबाबत राजकारण केले जाते. यामुळे भाजपचा खरा चेहरा उघड झाला, असे मुश्रीफ यांनी सांगितले.