Sat, Jul 20, 2019 15:56होमपेज › Mumbai-Thane-Raigad › भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्रिपद भाजपने सेनेकडून काढून घेतले

भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्रिपद भाजपने सेनेकडून काढून घेतले

Published On: Jan 16 2018 2:13AM | Last Updated: Jan 16 2018 1:00AM

बुकमार्क करा
मुंबई : विशेष प्रतिनिधी 

भंडारा- गोंदिया मतदारसंघाचे भाजप खासदार नाना पटोले यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत खासदारकीचाही राजीनामा दिल्याने या मतदारसंघात लवकरच पोटनिवडणूक होण्याची शक्यता आहे. नाना पटोले यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावरच टीका करीत भाजप सोडल्याने भाजपने ही पोटनिवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्रिपद शिवसेनेनेकडून काढून घेत तेथे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे जबाबदारी सुपूर्द केली आहे. 

भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्रिपद शिवसेनेच्या डॉ. दीपक सावंत यांच्याकडे होते. मात्र, त्यांच्याऐवजी बावनकुळे यांच्या नियुक्तीचे आदेश काढण्यात आले आहेत. बावनकुळे यांच्याकडे नागपूरचे पालकमंत्रिपद असताना भंडारा जिल्ह्याचीही जबाबदारी देण्यात आली आहे. त्यापाठी भाजपचे मिशन पोटनिवडणूक आहे. नाना पटोले यांनी खासदारकीचा राजीनामा देऊन काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. पटोले हे लोकसभा पोटनिवडणूक लढविणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र, पटोले यांनी मोदींना आव्हान देत पक्ष सोडल्याने ही निवडणूक भाजपसाठी महत्त्वाची बनली आहे. ही निवडणूक पटोले जिंकले तर ते भाजपला परवडणारे नसल्याने भाजपने आतापासून फिल्डिंग लावायला सुरुवात केली आहे. 

भंडारा-गोंदिया या दोन जिल्ह्यांचा मिळून हा मतदारसंघ बनला आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचे मनोमिलन झाल्याने आणि भविष्यात लोकसभा आणि विधानसभा निवडणुका दोन्ही पक्ष एकत्र लढविण्याची शक्यता असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार प्रफुल्ल पटेल हे तेथून निवडणूक लढतील की नाही? याबाबत साशंकता आहे. अशावेळी पटोले आणि भाजपमध्येच सामना रंगण्याची शक्यता आहे. त्यामुळे आतापासून भाजपने रणनीती आखायला सुरुवात केली आहे. त्यासाठी बावनकुळे यांच्यासारखा कसलेल्या मंत्र्याकडे भंडार्‍याचे पालकमंत्रिपद देण्यात आल्याची चर्चा आहे. 

डॉ. दीपक सावंत यांच्याकडे सुरुवातीला उस्मानाबादचे पालकमंत्रिपद होते. त्यानंतर त्यांना भंडार्‍याचे पालकमंत्रिपद देण्यात आले. आता त्यांना कोणत्या जिल्ह्याची जबाबदारी मिळणार याबाबत उत्सुकता आहे.