Fri, Jul 19, 2019 07:25होमपेज › Mumbai-Thane-Raigad › अॅसिडीटी, मळमळ...पोटदुखी अग्रलेखात दिसेल; शेलारांचा शिवसेनेला टोला

अॅसिडीटी, मळमळ...पोटदुखी अग्रलेखात दिसेल; शेलारांचा शिवसेनेला टोला

Published On: Mar 03 2018 2:23PM | Last Updated: Mar 03 2018 2:23PMमुंबई : पुढारी ऑनलाईन
त्रिपुरामध्ये भाजपला मिळालेला एकतर्फी विजय, नागालँड आणि मेघालयमधील अनपेक्षित कामगिरी यामुळे भाजपचे नेते कार्यकर्ते देशभरात जल्लोष करत आहेत. भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी या विजयानंतर शिवसेनेला चिमटा काढला आहे. या विजयामुळे काहींना अॅसिडीटी, मळमळ...पोटदुखी ही होईल ? ती उद्या कदाचित अग्रलेखातून दिसेलही, असा टोला शेलार यांनी शिवसेना आणि सामना यांना लगावला आहे. "आज नाखुश तो बहुत होगे तुम…..!" असा फिल्मी डायलॉगबाजीही त्यांनी केली आहे.  


ईशान्येतील राज्यांमध्ये भाजपला आजवर कधीच यश मिळालं नाही. त्यामुळेच त्रिपुरा, नागालँड आणि मेघालयातील विधानसभा निवडणूक निकालांकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले होते. या तिन्ही ठिकाणी भाजपने अनपेक्षित कामगिरी केल्याने देशभरात भाजप नेते आणि कार्यकर्ते सुखावले आहेत. आशिष शेलार यांनी ट्विट करून या विजयाचा आनंद शेअर केला आहे. पहिल्या ट्विटरमध्ये शेलार यांनी म्हटले आहे की, ईशान्यकडील तिन्ही राज्यात भाजपला अभूतपूर्व यश! तमाम मतदार , पंतप्रधान मोदीजी ,राष्ट्रीय अध्यक्ष अमितभाई शाह आणि मुंबईकर सुनिल देवधर यांचे मनःपूर्वक अभिनंदन!.
त्यानंतर केलेल्या ट्विटरमध्ये शेलार यांनी शिवसेनेला चिमटा काढला आहे. ते म्हणाले की, देशातील प्रत्येक कानाकोप-यातील जनता भाजपच्या सोबतच आहे हे पुन्हा पुन्हा सिध्द होते आहे... पण  तरीही काहींना अॅसिडीटी, मळमळ...पोटदुखी ही होईल ? ती उद्या कदाचित अग्रलेखातून दिसेलही ? "आज नाखुश तो बहुत होगे तुम…..! "


गेल्या काही महिन्यांपासून विशेषत: मुंबई महापालिकेत भाजपला मिळालेल्या यशानंतर शिवसेना आणि भाजप यांच्यात कलगीतुरा रंगला आहे. प्रामुख्याने भाजपचे आशिष शेलार आणि शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांच्यात ट्विटरवरून अक्षरशः शाब्दिक युद्ध सुरू आहे. आता शेलार यांच्या ट्विटला राऊत काय प्रत्युत्तर देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.