होमपेज › Mumbai-Thane-Raigad › विधान परिषदेचा 'प्रसाद' लाड यांना

विधान परिषदेचा 'प्रसाद' लाड यांना

Published On: Dec 07 2017 6:00PM | Last Updated: Dec 07 2017 6:00PM

बुकमार्क करा

मुंबई : प्रतिनिधी

महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष तथा माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी विधानपरिषदेच्या आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर रिक्त जागेवर भाजपचे प्रसाद लाड यांनी बाजी मारली आहे. त्यांनी काँग्रेस उमेदवार दिलीप माने यांचा पराभव केला. लाड यांना २०९, तर माने यांना ७३ मते मिळाली. युतीच्या मतांचे संख्याबळ पाहता लाड यांचे पारडे जड होते. पण, त्यांनी २०९ मते मिळविल्यामुळे राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त होत आहे. या निवडणुकीतील विजयाबद्दल लाड यांनी युतीच्या सर्व नेत्यांचे आणि मतदारांचे आभार मानले आहेत. तसेच, पाठिशी राहिलेल्या अदृष्य व्यक्तींचेही आभार मानत असल्याची प्रतिक्रिया त्यांनी टीव्ही माध्यमांशी बोलताना दिली. 

विधानपरिषदेच्या एका जागेसाठी नारायण राणेंना भाजपकडून उमेदवारी मिळणार का यावरुन या निवडणुकीला रंगत आली होती. मात्र, शिवसेनेचा टोकाचा विरोध लक्षात घेता भाजपने प्रसाद लाड यांना विधान परिषदेची उमेदवारी दिली होती. त्यानंतर काँग्रेसकडून माजी आमदार दिलीप माने यांना उमेदवारी देण्यात आली होती. 

या विधानपरिषद पोटनिवडणुकीच्या मतदानावर एमआयएमने बहिष्कार टाकला होता. पक्षाचे इम्तियाझ जलिल आणि वारिस पठाण यांनी मतदानावर बहिष्कार टाकला तर; राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ हे मतदानासाठी आले नाहीत. शिवसेनेचे नेते आणि राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांची न्यायालयाने आमदारकी रद्द केल्याने ते मतदानात भाग घेऊ शकले नाही.