Sun, Jul 21, 2019 12:00होमपेज › Mumbai-Thane-Raigad › कणकवलीमध्ये राणेंचा भाजपला दे धक्‍का; गुहागरात अपक्ष जोरात

कणकवलीमध्ये राणेंचा भाजपला दे धक्‍का; गुहागरात अपक्ष जोरात

Published On: Apr 13 2018 1:38AM | Last Updated: Apr 13 2018 1:36AMमुंबई : विशेष प्रतिनिधी

राज्यातील सर्वच राजकीय पक्षांनी प्रतिष्ठेच्या केलेल्या सहा नगरपालिकांच्या निवडणुकीत भाजपने बाजी मारून आपणच नंबर वन असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. दरम्यान राज्याचे लक्ष लागलेली कणकवली नगरपंचायत नारायण राणे यांच्या महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाने खिशात टाकली. विशेष म्हणजे ज्या भाजपच्या कोट्यातून नारायण राणे खासदार झाले त्यांनीच या निवडणुकीत भाजप-शिवसेनेचा दारूण पराभव करत भाजपला एकप्रकारे  वेगळाच धक्‍का दिला. कहर म्हणजे महाराष्ट्र स्वाभिमानने राष्ट्रवादी काँग्रेसशी आघाडी करून ही निवडणूक लढवली होती.

वैजापूर, देवरूख, जामनेर, आजरा या नगरपालिकांवर भाजपा झेंडा फडकला आहे. खासदार नारायण राणे यांच्या राजकीय अस्तित्वासाठी महत्त्वाच्या समजल्या जाणार्‍या कणकवली नगरपालिकेची सत्ता राणे यांनी आपल्या ताब्यात ठेवली आहे. तर गुहागरमध्ये शहर विकास आघाडीने 9 जागा जिंकत सत्ता खेचून आणली. राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या नेतृतच्वाखाली भाजपने लढविलेल्या जामनेर नगरपरिषदेच्या निवडणुकीत मोठे यश मिळविले आहे.  नगराध्यक्ष साधना महाजन यांच्यासह भाजपाचे सर्व 24 उमेदवार मोठ्या मतांच्या फरकाने निवडून आले आहेत.

नगराध्यक्षपदासाठी भाजपच्या साधना गिरीश महाजन यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रा. अजंली पवार यांच्यात सरळ लढत झाली होती. यात महाजन यांना 17 हजार893 , तर प्रा. पवार यांना 9हजार 540मते मिळाली. 8हजार 353मतांनी भाजपच्या साधना महाजन विजयी झाल्या. तर नगरसेवक पदावर भाजपचे सर्व 24 उमेदवार विजयी झाले आहेत.

भाजपा आणि शिवसेनेने कणकवली नगरपंचायतीच्या निवडणूकीसाठी युती केल्याने खासदार राणे यांच्यासाठी ही निवडणुक प्रतिष्ठेची ठरली होती. या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते. पण या नगरपंचायतीच्या निवडणुकीत राणे यांच्या महाराष्ट्र स्वाभिमानी पक्षाने 17 पैकी 11 जागांवर विजय मिळविला. या पक्षाचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार समीर नलावडे यांनी भाजपाचे उमेदवार संदेश पारकर यांचा पराभव केला आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादीला 1 जागा मिळाली. तर शिवसेना आणि भाजपला प्रत्येकी 3 जागांवरच समाधान मानावे लागले.

आजरा येथे भाजपा आणि ताराराणी यांनी 9 जागा जिंकून नगराध्यपद पटकाविले. याठिकाणी काँग्रेसला 6, तिसर्‍या आघाडीला 1 आणि एका जागी अपक्ष निवडून आले आहेत. वैजापूर, देवरूख येथेही भाजपाने अध्यक्षपद काबीज केले आहे. देवरूखमध्ये भाजपाला 7 तर वैजापूर येथे 8 जागा मिळाल्या. गुहागरमध्ये शहर विकास आघाडीने 9 जागा जिंकल्या असून, 6 जागी भाजपा निवडून आली आहे.
सहा नगरपालिकांमधील  एकूण 115 पैकी 57 ठिकाणी भाजपा आणि भाजपा समर्थित नगरसेवक निवडून आले आहेत. यातही 48 नगरसेवक हे भाजपाच्या तिकिटावर तर 9 हे समर्थित आहेत.

Tags : Mumbai, six municipal corporation, BJP,  won, Kanakwali Nagar Panchayat Narayan Rane,  Mumbai news,