Mon, Aug 26, 2019 00:00होमपेज › Mumbai-Thane-Raigad › भाजपची 'चौथी सीट'; काँग्रेसची चिंता वाढली

भाजपची 'चौथी सीट'; काँग्रेसची चिंता वाढली

Published On: Mar 13 2018 2:19AM | Last Updated: Mar 13 2018 2:19AMमुंबई : विशेष प्रतिनिधी 

महाराष्ट्र विधानसभेतून राज्यसभेवर निवडून द्यायच्या सहा जागांसाठी भाजपने तीन ऐवजी चार उमेदवार रिंगणात उतरविल्याने या निवडणुकीत रंगत निर्माण झाली आहे. माजी मुख्यमंत्री नारायण राणे, केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, व्ही. मुरलीधरन यांच्यासह भाजपने राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांचा उमेदवारी अर्ज भरल्याने काँग्रेसची चिंता वाढली आहे. 15 मार्च रोजी उमेदवारी अर्ज मागे घेतले जाणार असून त्यावेळी या निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे. 

माजी मुख्यमंत्री आणि महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे संस्थापक नारायण राणे यांनी भाजपचे उमेदवार म्हणून आज उमेदवारी अर्ज दाखल केला. केरळ भाजपचे नेते व्ही. मुरलीधरन यांनीही उमेदवारी अर्ज भरला. त्रिपुरामध्ये भाजपने विजय मिळविल्यानंतर डाव्यांच्या केरळमधील परंपरागत बालेकिल्ल्यात ताकद वाढविण्याची त्यामागे भाजपची रणनीती आहे. प्रकाश जावडेकर यांनी याआधीच आपला अर्ज भरला होता. तर काँग्रेसकडून ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांनीही निवडणूक अर्ज भरला. मात्र, भाजपच्या खेळीने काँग्रेसच्या गोटात चिंता आणि संभ्रम निर्माण झाला आहे. भाजपने चौथा उमेदवार रिंगणात कायम ठेवला आणि शिवसेनेने भाजपला साथ दिली तर काँग्रेसचा उमेदवार धोक्यात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे केतकर यांनीही निकालानंतरच प्रतिक्रिया देऊ असेअर्जाची मंगळवारी 13 तारखेला छाननी होणार अर्ज माघे घेण्याची मुदत 15 मार्च आहे. उमेदवारांना दुपारी तीन वाजेपर्यंत आपला अर्ज मागे घेतला येईल.

त्यानंतर ही निवडणूक बिनविरोध होणार की नाही ते स्पष्ट होणार आहे. सहा उमेदवारांचे अर्ज राहीले तर निवडणूक बिनविरोध होईल. मात्र, सात उमेदवार रिंगणात राहीले तर जिंकण्यासाठी एका उमेदवाराला किमान 42 मतांची गरज लागेल. विधानसभेत काँग्रेसचे 42 सदस्य होते. मात्र, डॉ. पतंगराव कदम यांच्या निधनामुळे काँग्रेस संख्याबळ आता 41 झाले आहे. त्यातच आमदार नितेश राणे आणि कालीदास कोळंबकर हे काय करतील हे सांगता येत नाही. या निवडणुकीत पक्षाचा व्हीप लागू होतो. मात्र, पक्षाचा व्हीप या दोघांनी झुगारला आणि शिवसेनेने भाजपला मदत केलीच तर केतकर यांची वाट बिकट होउ शकते. काँग्रेसला शेकाप, समाजवादी पार्टी, एमआयएम यांच्या मतांची अपेक्षा आहे. मात्र, राष्ट्रवादी आपला उमेदवार सुरक्षीत करण्यासाठी याची मते घेण्याचे पूर्ण प्रयत्न करेल. कारण राष्ट्रवादी काँग्रेसचे तुरुंगात असलेले आमदार रमेश कदम यांनीही मागील दोन निवडणुकांमध्ये भाजपला मतदान केले आहे.