अवघ्या १६० दिवसात भाजपच्या तीन लढवय्या महामेरूंची चटका लावणारी 'एक्झिट'! 

Published On: Aug 24 2019 3:41PM | Last Updated: Aug 24 2019 6:27PM
Responsive image

परशराम पाटील : पुढारी ऑनलाईन


विशिष्ट विचारधारेला वाहून सत्तेसाठी पराकोटीचा संघर्ष केल्यानंतर भारतीय जनता पक्षाने २०१४ मध्ये देशात पहिल्यांदा एकहाती सत्ता खेचून आणली. यामध्ये अनेक मातब्बर नेत्यांचे योगदान राहिले. जनसंघाचा भारतीय जनता पक्ष होईपर्यंत ते सत्तेचे सोपान गाठून देण्यात अनेक मोहऱ्यांचे योगदान आहे.

कधीकाळी म्हणजेच १९८४ मध्ये लोकसभेत भाजपचे अवघे दोन सदस्य होते. तेव्हा भारतीय जनता पक्षामध्ये दिवंगत माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी आणि भाजपचे भीष्म पितामह लालकृष्ण अडवाणी यांचे प्राबल्य होते. तेव्हापासून ते २०१४ पर्यंत संघर्ष करून भाजपने संपूर्ण सत्तेचे सोपान गाठले. भाजपला पहिल्यांदा सत्तेची चव १९९६ मध्ये चाखायला मिळाली.

१९९६ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजप १६२ जागांसह सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयाला आला. लोकसभा निकाल त्रिशंकू राहिल्याने भाजपला सत्ता स्थापनेसाठी निमंत्रण मिळाले. अटल बिहारी वाजपेयी यांनी पंतप्रधान म्हणून शपथ घेतली. लोकसभेत विश्वासमत प्रस्ताव चर्चेवेळी इतर पक्षांकडून पाठिंबा मिळविणे भाजपला शक्य झाले नाही. त्यामुळे बहुमत चाचणी न घेताच वाजपेयींनी १३ दिवसांत राजीनामा दिल्याने सरकार कोसळले.

दुसऱ्या खेपेला वाजपेयींना १३ महिने सरकार सांभाळण्याची संधी मिळाली. त्यानंतर १९९९ साली झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये राष्ट्रीय लोकशाही आघाडीला घवघवित यश मिळाले. अटल बिहारी वाजपेयींनी भाजपकडून सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली.

त्यानंतर २००४ आणि २००९ मध्ये भाजपला सलग दोनदा दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. त्यानंतर २०१४ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभूतपूर्व लाट निर्माण करताना सत्ता खेचून आणली. यावर्षी झालेल्या निवडणुकीमध्येही मोदींनी भाजपच्या इतिहासातील सर्व विक्रम मोडीत काढून नवीन विक्रमी जागांनी केंद्रात सत्ता स्थापन केली.   

या प्रदीर्घ राजकीय प्रवासात भाजपच्या अनेक नेत्यांचे योगदान राहिले. सत्तेचा सुवर्णकाळ आला असतानाच  भाजपच्या लढवय्या नेत्यांची झालेली अकाली एक्झिट नक्कीच मनाला लागणारी आहे. पहिल्यांदा गेल्यावर्षी ऑगस्ट महिन्यात वाजपेयी यांनी अखेरचा श्वास घेतला. वाजपेयी निधन समयी राजकारणात सक्रिय नव्हते, पण त्यांची पोकळी कधीही भरून काढता येणार नाही.

वाजपेयी यांच्या निधनानंतर भाजपला आणखी एक झटका दक्षिणेतील दिग्गज नेते अनंत कुमार यांच्या रुपाने बसला. अनंत कुमार यांच्या निधनाच्या बातमीने सर्वांनाच धक्का दिला. कर्नाटकमधील असलेल्या अनंत कुमार यांचे १२ नोव्हेंबर २०१८ मध्ये अखेरचा श्वास घेतला. त्यांनी पीएम मोदी यांच्या पहिल्या मंत्रिमंडळात संसदीय कामकाज मंत्रीपद सांभाळले. 

अनंत कुमार यांच्या निधनानंतर देशाचे माजी संरक्षण मंत्री आणि गोव्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी याचवर्षी मार्च महिन्यात १७ तारखेला अखेरचा श्वास घेतला. जीवनाच्या अखेरच्या क्षणापर्यंत भाजपमध्ये ते सक्रिय राहिले. पर्रिकरांनी ज्या स्थितीत काम केले त्यावरून संपूर्ण देश हळहळला. पर्रिकरांनी प्रदीर्घ काळ कॅन्सरशी लढा दिला. उरीवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने सर्जिकल स्ट्राईक करून जगाला कणखर बाण्याचे दर्शन दिले. यावेळी संरक्षण मंत्रालयाची जबाबदारी पर्रिकरांवर होती. त्यांनी ती जबाबदारी यशस्वी पार पाडली होती.

त्यानंतर देशात लोकसभा निवडणूक पार पडली. या निवडणुकीमधून दिल्लीतील दोन मातब्बर नेते आणि पक्षाच्या जडणघडणीत मोलाचे योगदान दिलेल्या माजी केंद्रीय मंत्री सुषमा स्वराज आणि अरुण जेटली यांनी प्रकृतीच्या कारणास्तव सक्रिय राजकारणातून माघार घेतली. त्यांनी तसे पत्र लिहून पीएम मोदींना कळवले. सत्तेच्या खुर्चीला चिकटून राहण्याची परंपरा देशात रुजत असताना या दोन नेत्यांनी विनम्रपणे सरकारमध्ये सहभागी होण्यास नकार देऊन वेगळा आदर्श निर्माण केला. 

दोघांनी सक्रिय राजकारणातून माघार घेऊनही त्यांनी सोशल मीडियावरून लोकसंपर्क कायम ठेवला. तसेच विरोधकांवर हल्लाबोल करण्याची एकही संधी सोडली नाही. सुषमा स्वराज यांनी कलम ३७० हद्दपार केल्यानंतर ट्विट करून सरकारचे अभिनंदन केले होते, पण त्यानंतर फक्त तीन तासांनी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्यांनी इहलोकीचा निरोप घेतला. 

त्यांच्या एक्झिटवर क्षणभर कोणाचाही विश्वास बसला नाही, पण वास्तव लपवता येत नाही म्हणतात तसेच झाले. त्यांनी याच महिन्यात ६ ऑगस्टला अखेरचा निरोप घेतला आणि संपूर्ण देश शोकसागरात बुडाला.   

भाजप या झटक्यातून सावरत आहे, तोवरच आज (ता.२४) दुसरा जबर झटका बसला. माजी केंद्रीय अर्थमंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे धुरंदर नेते तसेच निष्णात वकील अरुण जेटली यांचा प्रकृतीशी चाललेला संघर्ष आज थांबला. प्रदीर्घ कालावधीपासून कॅन्सरशी झुंज देत असलेल्या जेटली यांनी एम्स रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला.

ज्या नेत्यांनी अथक प्रयत्नांनी भाजपला सुवर्णकाळ मिळवून दिला ते मोहरे एक एक करून काळाच्या पडद्याआड जात आहेत. ही भाजपची न भरून येणारी हानी आहे हे मात्र निश्चित. पक्षातील अनेक ज्येष्ठ नेते मोदी-शहांच्या जोडगोळीसमोर विस्मृतीत गेले आहेत, पण जे मोदी-शहांच्या प्रभावातही सक्रिय होते त्यांच्या अकाली जाण्याने निश्चितच मोठी पोकळी निर्माण झाली आहे.