Sun, May 26, 2019 12:36होमपेज › Mumbai-Thane-Raigad › भाजप नगरसेवकाच्या पत्नीला रिव्हॉल्व्हर दाखवून धमकावले 

भाजप नगरसेवकाच्या पत्नीला रिव्हॉल्व्हर दाखवून धमकावले 

Published On: Feb 25 2018 1:42AM | Last Updated: Feb 25 2018 1:20AMडोंबिवली : वार्ताहर

भाजपचे नगरसेवक महेश पाटील यांची पत्नी पल्लवी पाटील यांना भाजप पुरस्कृत नगरसेवक कुणाल पाटील यांच्या समर्थकांनी भररस्त्यात रिव्हॉल्वरचा धाक दाखवून धमकावल्याचा आरोप पाटील यांनी केला आहे. कुणाल यांनी पल्लवी यांनी केलेला आरोप फेटाळून लावला आहे. याप्रकरणी मानपाडा पोलिसांनी अनोळखी व्यक्‍तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

नगरसेवक महेश पाटील हे सध्या न्यायालयीन कोठडीत तुरुंगात आहेत. त्यांच्यावर कुणाल पाटील यांच्या हत्येची सुपारी दिल्याचा गंभीर आरोप आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असतानाच पल्लवी यांनी कुणाल यांच्यावर गंभीर आरोप केल्याने पुन्हा एकदा महेश आणि कुणाल यांच्यातील वैमनस्य उफाळून आले आहे. 

पल्‍लवी या त्यांच्या एका मैत्रीणीसोबत कार्यक्रमाला गेल्या होत्या. त्यावेळी त्यांच्यासोबत दोन मुलेही होती. रस्त्यावरून पल्लवी यांची गाडी जात असताना त्याच रस्त्याने कुणाल पाटील यांच्या गाड्यांचा ताफा चालला होता. त्यापैकी एका गाडीतून काही लोकांनी पल्लवीला रिव्हॉल्वरचा धाक दाखवून जीवे ठार मारण्याची धमकी दिली. 

यानंतर पल्लवी यांनी आपल्या कार्यकर्त्यांसोबत तात्काळ मानपाडा पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्यानंतर भाजपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने पोलीस ठाण्याच्या आवारात जमले. तब्बल दोन तास भाजपच्या कार्यकर्त्यांचा गोंधळ सुरू होता. वाढता दबाव पाहता पोलिसांनी अनोळखी व्यक्‍तीविरेाधात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला.