Wed, Nov 21, 2018 15:48होमपेज › Mumbai-Thane-Raigad › भाजप नगरसेवकाने मनपातून फाईल चोरली

भाजप नगरसेवकाने मनपातून फाईल चोरली

Published On: May 13 2018 2:27AM | Last Updated: May 13 2018 2:10AMउल्हासनगर : वार्ताहर 

भाजपचे स्वीकृत नगरसेवक प्रदीप रामचंदानी यांनी उल्हासनगर पालिकेतील सार्वजनिक बारंधकाम विभागाच्या कार्यालयातून  एक फाईल चोरी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. प्रदीप रामचंदानी याचा मुलगा कंत्राटदार असून मनपाचे कोट्यवधी रुपयांची कंत्राटे त्याला मिळतात. त्यामुळे त्या व्यवहाराशी संबंधित ही फाईल असण्याची शक्यता आहे. शुक्रवारी दुपारी हा प्रकार घडला असून या प्रकरणी पोलिसांनी रामचंदानीला अटक केली आहे. 

रामचंदानी हा भाजपचा स्वीकृत नगरसेवक म्हणून दोन वेळा निवडून आला आहे. प्रदीप रामचंदानी व त्याचा मुलगा रोहीत यांच्या नावावर दत्त मजूर कामगार संघटना, ए. एम. रामचंदानी या दोन कंपन्या आहेत. मनपामध्ये ई टेंडरिंग असून सुद्धा काही मोजक्याच कंपनींना कंत्राटे मिळत असतात. शुक्रवारी दुपारी 1. 52 मिनिटांच्या सुमारास रामचंदानी हा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात घुसला आणि त्याने कपाटातून एक फाईल घेतली व ती आपल्या शर्टात लपविल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे. या अगोदर मनपाचा अन्य एक कंत्राटदार शशांक मिश्रा, प्रदीप रामचंदानी आणि कनिष्ठ अभियंता जितू चोयतानी हे चर्चा करीत असल्याचे फुटेजमध्ये दिसत आहे. त्यानंतर हे तिघेही बाहेर गेले, त्यानंतर लगेच रामचंदानी पुन्हा कार्यालयात आले आणि त्यांनी फाईल चोरी केली. 

यापूर्वी देखील विद्यमान स्थायी समिती सभापती जया माखीजा यांचे पती प्रकाश माखिजा याने कथितरित्या फाईल गायब केल्याचा आरोप झाला होता. सोशल मीडियावर रामचंदानी व भाजपच्या विरोधात संतापाची लाट उसळली असून अशा प्रकारे अजून कितीतरी फाईली मनपाच्या कार्यालयातून चोरीस गेल्या असतील, असा आरोप केला जात आहे. 

मनपाचे कनिष्ठ अभियंता जितू चोयतानी, प्रभारी सहाय्यक अभियंता महेश शितलानी आणि संदीप जाधव यांनी याबाबत मध्यवर्ती पोलीस ठाण्यात तक्रार केली. त्यानंतर रामचंदानी याच्या विरोधात चोरीचा गुन्हा दाखल करून त्यास अटक केली आहे. पोलीस उपायुक्त अंकित गोयल हे स्वतः उपस्थित राहून या प्रकरणाचा तपास करीत होते. दरम्यान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष बंडू देशमुख यांनी रामचंदनी यांच्याशी संबंधित असलेल्या सर्व कंपन्या या काळ्या यादीत टाकण्यात याव्यात. त्यांचे नगरसेवकपद रद्द करावे, अशी मागणी केली आहे.