Thu, Aug 22, 2019 10:15होमपेज › Mumbai-Thane-Raigad › शिवसेनेच्या मतदारसंघात भाजपची चाचपणी

शिवसेनेच्या मतदारसंघात भाजपची चाचपणी

Published On: Aug 13 2018 1:21AM | Last Updated: Aug 13 2018 12:49AMमुंबई : संदेश सावंत

राज्यात आगामी विधानसभा निवडणुकांत कोणत्याही परिस्थितीत पुन्हा भाजपाचीच सत्ता आली पाहिजे यादृष्टीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह सर्वांनीच जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत थोड्याफार फरकाने गेलेल्या जागांबरोबर शिवसेनेच्या ताब्यातील मतदारसंघात पक्षांतर्गत खासगी यंत्रणेद्वारे भाजपाने चाचपणी सुरू केली आहे. यामध्ये प्रतिस्पर्धी उमेदवारांचे कच्चे दुवे शोधण्याबरोबर स्वच्छ व निष्कलंक चारित्र्यवान  व्यक्तींचा शोध सुरू केला आहे. 

काँग्रेस-राष्ट्रवादीने सर्व धर्मनिरपेक्ष पक्षांची महाआघाडी निवडणुका लढण्याची तयारी चालविली आहे. तर केंद्रात व राज्यात भाजपासोबत सत्तेत असलेल्या शिवसेनेने स्वबळावर लढण्याची घोषणा करत त्या दृष्टीने संघटनात्मक बांधणीवर भर दिला आहे. हे लक्षात घेता भाजपानेही कोणत्याही परिस्थितीत केंद्रात व राज्यात पुन्हा भाजपाची सत्ता यावी यासाठी व्युहरचना आखण्यास सुरुवात केली आहे. यासाठी मुंबईसह राज्यभरात काही खास दुतांची नियुक्ती करून राजकीय व जातीय समीकरणांबरोबरच राजकीय पक्षांच्या संघटनात्मक ताकदीचा अंदाज घेतला जात आहे. हे करत असताना मराठा आरक्षण, महागाई, बेरोजगारी, नोटबंदी यासारख्या विषयांवर लोकांना बोलते करून आगामी निवडणुकांत हे मुद्दे कितपत कळीचे ठरतील याची देखील पाहणी केली जात आहे. 

मोदी लाटेत 2014 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपला सर्वाधिक जागा मिळाल्या, पण सत्तेसाठी शिवसेनेची मदत घ्यावी लागली. सत्तेत सहभागी असलेल्या शिवसेनेचा मागील चार वर्षांतील अनुभव पाहता त्यांच्या जागा कमी कशा होतील, काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आमदारांची संख्या मर्यादित कशी राहील यादृष्टीने भाजपाने संघटनात्मक आखणी करण्यास सुरुवात केली आहे. मागील विधानसभा निवडणुकीत थोड्याफार फरकाने गमवाव्या लागलेल्या मतदारसंघात भाजपाला अनुकूल परिस्थिती कशी निर्माण होईल. प्रस्थापितांविरोधी वातावरण निर्मिती, बाहेरचा उमेदवार दिला तर काय फरक पडेल याबाबत शिवसेनेच्या ताब्यातील लोकसभा व विधानसभा मतदारसंघात प्रामुख्याने चाचपणी केली जात आहे. 

राज्यात पुन्हा भाजपाची सत्ता आणायची असेल तर मागच्या निवडणुकीत मिळालेल्या जागा टिकविण्याबरोबर अधिकच्या जागा निवडून आणण्याचे आव्हान भाजपापुढे आहे. यासाठी स्वच्छ व निष्कलंक चारित्र्यवान व्यक्तींचा शोध भाजपा अंतर्गत खासगी यंत्रणेद्वारे सुरू करण्यात आला आहे. सध्या आमदार असलेल्यांबरोबर मागील निवडणुकीत दुसर्‍या व तिसर्‍या क्रमांकावर राहिलेल्या उमेदवाराची प्रतिमा स्वच्छ आहे का? गैरव्यवहाराचे आरोप, निष्कलंक  चारित्र्य, आर्थिक ताकद, जातीय पाठबळ, विकासाचा दृष्टिकोन, पक्षांतर्गत हेवेदावे, व्यक्तिगत अनुयायी, प्रभावी वकृत्व व प्रचार कौशल्याचे ज्ञान याबाबत माहिती गोळा केली जात आहे.