Wed, Nov 21, 2018 15:18होमपेज › Mumbai-Thane-Raigad › भाजपकडूनही स्वबळाची तयारी सुरू

भाजपकडूनही स्वबळाची तयारी सुरू

Published On: Jun 08 2018 1:37AM | Last Updated: Jun 08 2018 1:24AMमुंबई : उदय तानपाठक

युती करण्यास शिवसेनेने नकार वा होकार दिलेला नसताना भाजपने मात्र त्याची वाट न पाहता पुढच्या निवडणुकात स्वतंत्रपणे लढण्याची तयारी सुरू केली असून काल मातोश्रीवारीनंतर भाजपाध्यक्ष अमित शहा यांनीही आपल्या नेत्यांशी याचीच चाचपणी केल्याचे समजते. काल रात्री उशिरा सह्याद्री अतिथीगृहावर झालेल्या बैठकीत यावर चर्चा झाल्याचे समजते. दरम्यान, शिवसेना आपल्या निर्णयावर ठाम असल्याचे खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट केले आहे.

संपर्क फॉर समर्थन अभियानाच्या निमित्ताने अमित शहा यांनी कालच शिवसेना पक्षप्रमुखांची भेट घेतली होती. सुमारे दोन तासाहून अधिक काळ चाललेल्या या बहुचर्चित भेटीत या दोन नेत्यांमध्ये अनेक विषयांवर चर्चा झाली. राज्य सरकार आणि केंद्र सरकार, तसेच भाजपकडून झालेल्या अपेक्षाभंगासह अनेक विषयांवर उद्धव यांनी शहा यांच्याकडे आपली परखड मते मांडल्याचे मातोश्रीवरील सूत्रांचे म्हणणे आहे. 

शहा यांनी आगामी निवडणुकीत भाजपसोबत राहण्याची विनंती उद्धव यांना केली. भाजपा विरोधांनी एकत्र येऊन निवडणुका लढवण्याचा निर्धार केला असताना, काँग्रेसविरोधकांनी आपापसातले मतभेद बाजूला ठेवून एकत्र येण्याची गरज शहा यांनी ठाकरे यांच्याकडे प्रतिपादन केल्याचे समजते. 

उद्धव ठाकरे यांनी यावर कोणताही प्रतिसाद शहा यांना दिला नाही. मात्र, त्यांच्यातील चर्चा आशादायक होती, असे भाजपातून सांगितले जात आहे. असे असूनही काल मातोश्रीवरून अमित शहा थेट सह्याद्री अतिथीगृहावर पोहोचले. तेथे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, प्रदेश संघटक विजय पुराणिक आणि अन्य काही मंत्री तसेच भाजपाचे नेते उपस्थित होते. या नेत्यांशी शहा यांनी चर्चा केली. भाजपाने एकट्याने निवडणुका लढवल्यास कितपत यश मिळेल, तसेच कोणत्या अडचणी येतील यावर शहा यांनी आपल्या पक्षाच्या नेत्यांशी चर्चा केल्याचे समजते. गेल्या काही दिवसांपासून भाजपाने राज्य स्तरावर स्वबळाची तयारी सुरू केली आहे. लोकसभेच्या कोणत्या जागांवर भाजपा नक्की विजयी होऊ शकेल, कोणत्या जागांसाठी खास प्रयत्न करावे लागतील, आणि कोणत्या जागांवर विजय मिळणे असक्य आहे, याची माहिती राज्यातल्या नेत्यांनी शहा यांना दिली, त्याचबरोबर विद्यमान खासदारांच्या कामगिरीचाही अहवालही शहा यांना देण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातल्या शेतकरी आंदोलन, मराठा आरक्षण आदी प्रश्‍नांबाबत पक्षाध्यक्षांशी चर्चा केल्याचे सांगण्यात आले. 

भाजपाचा खासदार असलेले मतदारसंघ आणि अन्य पक्षांचा खासदार असलेल्या मतदारसंघांबाबत भाजपाचे वेगवेगळे नियोजन असून त्यानुसार काम सुरू असल्याचे शहा यांना सांगितले गेले.