Mon, Apr 22, 2019 16:37होमपेज › Mumbai-Thane-Raigad › पालघरच्या मैदानात भाजपा विरुद्ध सेना

पालघरच्या मैदानात भाजपा विरुद्ध सेना

Published On: May 09 2018 1:56AM | Last Updated: May 09 2018 1:50AMमुंबई : विशेष प्रतिनिधी

पालघर जिल्हा निर्मीतीमध्ये मोठा वाटा असलेले काँग्रेस नेते माजी राज्यमंत्री राजेंद्र गावित यांनी मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत मुंबईतील भाजप मुख्यालयात पक्षप्रवेश केला. भाजप खासदार चिंतामण वनगा यांच्या निधनामुळे 28 मे रोजी होणार्‍या पालघर लोकसभेच्या पोटनिवडणुकीसाठी गावित यांच्या नावाची यावेळी घोषणा करण्यात आली. त्यामुळे शिवसेनेने हायजॅक केलेले दिवंगत वनगा यांचे पुत्र श्रीनिवास व गावित यांच्यामध्येच ही लढाई होणार आहे.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, पालघरमध्ये चिंतामणराव वनगा यांनी पक्ष वाढविला. गेल्या 30 ते 40 वर्षांपासुन ते अविरत मेहनत घेतली आहे. वनगांच्या निधनांनतर त्यांच्या मुलालाच भाजपकडून तिकीट मिळणार होते. मात्र शिवसेनेने अशा प्रकारे वागायला नको होते. वनगा यांचे पुत्र भाजपचे उमेदवार असतील, अशी माहिती शिवसेनेला दिली होती. पण त्याकडे शिवसेनेने दुर्लक्ष केले. 

गेल्या पाच दिवसापासुन वनगांच्या पुत्रांना शिवसेनेने कोणाशी बोलु दिले नाही. जे झाले ते दुर्दैवी आहे.पालघरची जागा भाजपची असल्यामुळे शिवसेनेने माघार घ्यावी. वनगा आमच्या कुटुंबातीलच आहेत. त्यांच्या परिवाराचे आम्ही पुनर्वसन करु.आम्हाला अजूनही शिवसेनेच्या पाठिंब्याची आशा असून त्यांनी भाजपच्या उमेदवाराचे समर्थन करावे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

पालघरमध्ये पक्षवाढीसाठी व विकासासाठी वनगा यांनी परिश्रम घेतले आहेत. त्यामुळे या पोटनिवडणुकीमध्ये भाजपचे उमेदवार गावित यांचा विजय हीच त्यांना खरी श्रध्दांजली ठरेल, अशी भावनाही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली. 2014 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या पुर्वीपासुन भाजपा गावित यांच्या संपर्कात आहे. त्यांनी पक्षात यावे, याबाबत त्यांच्यासोबत चर्चा झाली होती. पण चर्चा फलद्रुप झाली नाही, अशी माहितीही त्यांनी दिली.

भाजप प्रदेशाध्यक्ष खासदार दानवे यांनी गावित यांचा विजय निश्‍चित होईल, असा दावा केला तर पालघरमधील आदिवासी व या भागातील शहरी जनतेच्या विकासासाठी आपण राज्यमंत्री असताना कामे केली आहेत. त्यामधील प्रलंबित कामे पुर्ण करण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस सहकार्य करतील, असा विश्‍वास राजेंद्र गावित यांनी यावेळी केला.

Tags : Mumbai, mumbai news, BJP, Shiv Sena, Palghar,