Thu, Jul 18, 2019 12:16होमपेज › Mumbai-Thane-Raigad › कर्नाटक निकालावरून भाजप-शिवसेनेत कलगीतुरा

कर्नाटक निकालावरून भाजप-शिवसेनेत कलगीतुरा

Published On: May 16 2018 1:45AM | Last Updated: May 16 2018 1:45AMमुंबई : प्रतिनिधी

कर्नाटकच्या निकालावर शिवसेना व मनसेने इलेक्ट्रॉनिक्स मतदान यंत्रांना टार्गेट केले आहे. त्याला प्रत्युत्तर देताना भाजपने पालघर ठासून, तर भंडारा ठोकून घेणार असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. निवडणूक निकालावरून भाजप-शिवसेनेतील कलगीतुर्‍याला धार आली आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपला एकमार्गी विजय मिळणे पटत नसल्याचे म्हटले आहे. शिवसेना व राष्ट्रवादीने यापुढील सर्व निवडणुका या मतपत्रिकेवर घेण्याची मागणी निवडणूक आयोगाकडे केली आहे. काँग्रेसने हे निकाल अनपेक्षित असल्याचे म्हटले आहे.

इलेक्ट्रॉनिक्स व्होटिंग मशीनवरच शंका घेत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ईव्हीएम मशीनबाबत सर्वांच्या मनात संशय असल्याने भाजपने मतपत्रिकेवर निवडणुका घेऊन तो काढून टाकावा, अशी मागणी केली आहे.

पालघरला शिवसेनाच जिंकणार

पालघरची पोटनिवडणूक शिवसेनाच जिंकणार, असे ठामपणे सांगून उद्धव ठाकरे म्हणाले की, वनगा परिवाराची अवहेलना झाली. त्या परिवाराला न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही ही निवडणूक लढवीत आहोत. भाजपला जर विश्‍वास असेल, तर एकदा मतपत्रिकेवर निवडणुका घ्या, एकदा होऊनच जाऊ दे म्हणजे विरोधकही शांत बसतील, असे म्हणत त्यांनी ज्या राज्यातील लोकांना भाजपची राजवट नव्हती तेथे त्यांना यश मिळाले. मात्र, ज्या राज्यातील लोकांना भाजप राजवटीचा अनुभव आहे त्यांचे मत वेगळे असू शकते, असेही त्यांनी म्हटले आहे.

ईव्हीएमचा विजय असो : राज ठाकरे

भाजपवर टीकेचे आसूड ओढणारे व मोदीमुक्‍त भारताचा नारा देणारे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी इलेक्ट्रॉनिक्स व्होटिंग मशीनचा विजय असो, अशा शब्दांत आपल्या खास ठाकरी शैलीत प्रतिक्रिया व्यक्‍त केली आहे. राज ठाकरे यांनी अलीकडच्या काळातील आपल्या बहुतेक भाषणांतून भाजपला टार्गेट केले आहे. राज यांनी ट्विट करून आपली प्रतिक्रिया व्यक्‍त केली.

भाजपचा विजय पटत नाही : जयंत पाटील

भाजपचा विजय पटत नसल्याचे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी म्हटले आहे. कर्नाटकात काँग्रेसची परिस्थिती चांगली होती. तेथील लोक काँग्रेस सरकारबद्दल नकारात्मक बोलत नव्हते. काँगे्रेसला चांगले वातावरण होते. त्यामुळे त्यांचा विजय अपेक्षित होता, असेही ते म्हणाले. 

मतपत्रिकेवर निवडणुका घ्या

ईव्हीएमवर लोकांचा विश्‍वास नाही, ते मॅनेज केले जाऊ शकते, हे देशातील अनेक मान्यवर बोलत आहेत. त्यामुळे निवडणूक आयोगाने ईव्हीएमचा आग्रह सोडून परत मतपत्रिकांचा वापर करावा. मतमोजणीला वेळ लागेल; पण लोकांच्या मनातील शंका दूर होतील, असेही जयंत पाटील म्हणाले.

काँग्रेससाठी अनपेक्षित निकाल : चव्हाण

कर्नाटकातील निकाल हे काँगेस पक्षासाठी अनपेक्षित असल्याचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे. कर्नाटकात सिद्धरामय्या यांची कारकीर्द चांगली होती. मात्र, भाजपने पैसा व सत्तेता दुरुपयोग केला. बहुमत नसले तरी ते सत्तास्थापनेसाठी कोणत्याही थराला जाऊ शकतात. काँगे्रसने जेडीएसला पाठिंबा दिला आहे. आता राज्यपाल काय निर्णय घेणार ते महत्त्वाचे आहे. लोकशाही मार्गाने निर्णय व्हावा असे वाटते, असेही चव्हाण यांनी म्हटले आहे.

पालघरला ठासणार : शेलार 

विरोधकांच्या या टीकेची मुंबई भाजपचे प्रदेशाध्यक्ष आशिष शेलार यांनी केवळ दोन ओळीत दखल घेतली आहे. त्यांनी ट्विट करून कर्नाटकात जिंकलो, मतदारांचे आभार. आता भंडारा जिंकू ठोकून आणि पालघर जिंकू ठासून, अशा मोजक्या शब्दांत विरोधकांचा समाचार घेतला आहे.

पोटनिवडणुकीत पराभव, निवडणुकीत विजय? : उद्धव

कर्नाटकच्या निवडणूक निकालावर प्रतिक्रिया व्यक्‍त करताना उद्धव ठाकरे यांनी, ज्या ठिकाणी पोटनिवडणूक होते तेथे भाजपचा पराभव होतो, मग निवडणुकीत भाजपचा विजय कसा? असा प्रश्‍न उपस्थित करत जे जे जिंकले त्यांचे अभिनंदन; त्यात भाजप असेल किंवा काँग्रेस असेल, असेही म्हटले आहे. कोणी निवडणुकीचे अंदाज लावू नयेत. कारण, ते खोटे ठरतात.  ईव्हीएमच्या गुढाची उकल अजून झालेली नाही. त्यामुळे संशय पिशाच काढून टाकण्यासाठी निवडणुका या मतपत्रिकेवर झाल्या पाहिजेत. भाजपची घोडदौड ही निवडणुकांमध्ये दिसते आणि पोटनिवडणुकीत ते हरतात, असेही उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.