Wed, Jul 17, 2019 20:41होमपेज › Mumbai-Thane-Raigad › भाजप-शिवसेना युती, तर काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी

भाजप-शिवसेना युती, तर काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी

Published On: May 04 2018 1:49AM | Last Updated: May 04 2018 7:25AMमुंबई : विशेष प्रतिनिधी

आता मुका घेतला तरी युती नाही, असे जाहीर करणार्‍या शिवसेनेने विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी भाजपसोबत युती केली. मात्र, दररोज आघाडीच्या शपथा वाहणार्‍या काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडीवरून बिनसल्याची चर्चा असताना गुरुवारी या दोन्ही पक्षांत जागा वाटपात एकमत झालेे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीने 28 जून रोजी होणार्‍या विधान परिषद आणि लोकसभेची पोटनिवडणूक एकत्र लढण्याचा निर्णय घेतला आहे.

दोन्ही पक्षांच्या ज्येष्ठ नेत्यांमध्ये झालेल्या समझोत्यानुसार उस्मानाबाद-बीड-लातूर, नाशिक आणि कोकण विधान परिषदेची निवडणूक राष्ट्रवादी तर अमरावती, वर्धा आणि परभणीची जागा काँग्रेस लढवेल. भाजपचे तत्कालीन खासदार नाना पटोले यांनी राजीनामा दिल्यामुळे रिक्‍त झालेली भंडारा-गोंदिया लोकसभेची जागा राष्ट्रवादी, तर भाजपचे खासदार चिंतामण वनगा यांच्या निधनामुळे रिक्‍त झालेली पालघरची जागा काँग्रेस लढवणार असल्याची माहिती राष्ट्रवादीचे मुख्य प्रवक्‍ते नवाब मलिक यांनी दिली.

सेना-भाजपची विधान परिषद निवडणुकीसाठी युती झाली. मात्र, काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये जागा वाटपावरून नाराजी होती. ज्येष्ठ नेत्यांनी दुसर्‍या फळीतील नेत्यांची समजूत काढल्याने आघाडी झाली.
आघाडीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील तर काँग्रेस पक्षातर्फे अशोक गेहलोत, प्रभारी मोहन प्रकाश, प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यात चर्चा होऊन निर्णय घेण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून रमेश कराड (लातूर), शिवाजी सहाणे (नाशिक), अनिकेत तटकरे (कोकण) यांना उमेदवारी देण्यात आली आहे. पलूसमध्ये काँग्रेसचे आमदार पतंगराव कदम यांच्या निधनामुळे रिक्‍त झालेली जागा काँग्रेस लढणार आहे. राष्ट्रवादीने त्या ठिकाणी पाठिंबा दिला असल्याचे मलिक यांनी सांगितले.

Tags : Mumbai, BJP, Shiv Sena, alliance, Congress, NCP, alliance