Sat, Jul 20, 2019 15:21होमपेज › Mumbai-Thane-Raigad › भाजपाची राज्यसभेची ऑफर नारायण राणेंना अमान्य?

भाजपाची राज्यसभेची ऑफर राणेंना अमान्य?

Published On: Mar 04 2018 2:09AM | Last Updated: Mar 04 2018 2:09AMमुंबई : प्रतिनिधी

भाजपाने नारायण राणे यांना राज्यसभेवर पाठविण्याचे जवळपास निश्‍चित केले आहे. मात्र आ.नितेश राणे यांनी त्यांची महाराष्ट्रात अधिक गरज असल्याचे ट्विट केल्याने भाजपची राज्यसभेची ऑफर राणे पिता-पुत्रांना अमान्य असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे. 

महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष नारायण राणे यांना राज्यसभेवर पाठविण्याचा निर्णय भाजपाने जवळपास निश्‍चित केला आहे. भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्याशी दिल्लीत त्यांची बैठकही झाली आहे. यावर नारायण राणे काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, राणेंनी केंद्रात नाही तर महाराष्ट्रातच राहावे असे ट्विट नितेश यांनी केल्याने ते राज्यभेवर जाण्यास नाखूश असल्याचे बोलले जात आहे. 

राणेंनी राज्याच्या राजकारणात राहावे ही समर्थकांची भावना आहे. महाराष्ट्राला त्यांची गरज आहे. आम्हाला त्यांना राज्यसभेत नाही तर विधानसभेत पाहण्याची इच्छा असल्याचे ट्विटमध्ये म्हटले आहे. व्हॉट्सअ‍ॅप डीपीवर देखील नितेश यांनी महाराष्ट्राचा बुलंद आवाज, साहेब महाराष्ट्राला तुमची गरज आहे, कट्टर राणे समर्थक असे पोस्टर झळकावले आहे. यामुळे राणे नेमका काय निर्णय घेणार याची सर्वांनाच उत्सुकता आहे. 

राज्यसभेसाठी 23 मार्चला निवडणूक होत असून महाराष्ट्रात 6 जागा आहेत. विधानसभेतील संख्याबळाचा विचार केला तर भाजपाचे 3 उमेदवार राज्यसभेवर सहज पाठवता येतील. त्यापैकी एक जागा नारायण राणेंना देण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे. त्यांनी जर राज्यसभेची ऑफर नाकारली तर त्यांना राज्याच्या मंत्रिमंडळात स्थान देणार का? तसे झाल्यास शिवसेनेची भूमिका काय असेल याबाबत राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू आहेत.