होमपेज › Mumbai-Thane-Raigad › भाजप-राष्ट्रवादी आघाडीचे नवनिर्माण

भाजप-राष्ट्रवादी आघाडीचे नवनिर्माण

Published On: May 22 2018 1:39AM | Last Updated: May 22 2018 1:38AMमुंबई  ः उदय तानपाठक

अनेक महत्त्वाच्या नेत्यांबरोबरच भाजपा-शिवसेना आणि काँग्रेेस-राष्ट्रवादी यांच्यातील संबंधांचे भवितव्य ठरवणार्‍या सहा स्थानिक स्वराज संस्था विधान परिषदेच्या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात मतदान झाले. नाशिकमध्ये 100 टक्के, तर अन्य ठिकाणी 99 टक्के मतदान झाल्याची माहिती मिळाली आहे. भारतीय जनता पक्षाने या निवडणुकीच्या निमित्ताने शिवसेनेला धडा शिकवण्याचे ठरविले होते, त्यानुसार नाशिकमध्ये अखेरच्या क्षणी राष्ट्रवादीच्या उमेदवारास मते द्या, असा निरोप मुंबईतून पाठवला गेल्याचे समजते. अन्य ठिकाणी झालेल्या मतदानाच्या अंदाजानुसार काँग्रेस-राष्ट्रवादी तीन आणि भाजपा दोन जागांवर विजयी होईल, अशी शक्यता असून शिवसेनेला मात्र, कोणत्याही जागेवर विजय मिळेल असे ठामपणे सांगता येत नाही. परभणी-हिंगोली मध्येही सेनेपुढे काँग्रेसने कडवे आव्हान उभे केले आहे. 

शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी गेल्या काही महिन्यांपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपावर अत्यंत कठोर भाषेत टीका सुरू केली आहे. आगामी निवडणुका स्वबळावरच लढणार अशी घोषणाही ठाकरे यांनी केली आहे. त्यामुळे शिवसेनेला या निवडणुकीच्या निमित्ताने जागा दाखवून देण्याचा विडाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उचलला होता.

त्यानुसार काही ठिकाणी राष्ट्रवादीला मदत करायची, मात्र शिवसेनेच्या उमेदवारास मते जाऊ द्यायची नाही, अशी रणनीती आखण्यात आली होती. त्यामुळेच नाशिकमध्ये भाजपाने शिवसेनेच्या विरोधात लढत असलेल्या राष्ट्रवादीच्या उमेदवारास मते देण्याचा आदेश आपल्या मतदारांना दिला होता. भाजपचे संघटन मंत्री किशोर काळकर यांनी राष्ट्रवादीच्या उमेदवाराला मतदान करण्याचे आदेश काल रात्री उशिरा झालेल्या बैठकीत दिले असल्याचे बोलले जात असून त्यावरूनही भाजपात दोन गट झाल्याची चर्चा आहे. 

राष्ट्रवादीला दिलेल्या पाठिंब्याबाबत  प्रसार माध्यमांसमोर भाजपच्या नेत्यांनी बोलण्यास नकार दिला असला, तरी पालघरच्या पोटनिवडणुकीचा वचपा काढण्याचा प्रयत्न भाजपने केल्याचे बोलले जात आहे. नाशिकमध्ये शिवसेनेचे नरेंद्र दराडे, राष्ट्रवादीचे शिवाजी सहाणे आणि अपक्ष परवेज कोकणी हे रिंगणात असून सेनेचे सर्वाधिक 207 सदस्य आहेत. त्या खालोखाल भाजपचे 167, राष्ट्रवादी 100 तर काँग्रेसचे 71 सदस्य आहेत इतर पक्ष मिळून मतदारांची संख्या 99 आहे. मात्र ह्या निवडणुकीत भाजपच किंग मेकर ठरणार आहे. 

कोकणात राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे यांच्या मुलास मदत करा, असे भाजपाकडून खासदार नारायण राणे यांना सांगण्यात आले होते. त्यामुळे कोकणात सिंधुदुर्गातील मते यावेळी निर्णायक ठरणार आहेत. अमरावती आणि वर्धा या ठिकाणी भाजपाकडे स्पष्ट बहुमत आहे. 

उस्मानाबाद-लातूर-बीड मतदारसंघात पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे या बहिणभावात संघर्ष सुरू आहे. ग्रामविकास मंत्री असलेल्या पंकजा यांनी भाजपाचे सुरेश धस यांच्यासाठी मोठीच मोर्चेबांधणी केली असली, तरी राष्ट्रवादीने पुरस्कृत केलेल्या अशोक जगदाळे या अपक्ष उमेदवाराने मोठ्या प्रमाणात लक्ष्मीदर्शन घडवल्याने ते बाजी मारू शकतात. तेथे एका मताला पाच लाख रूपये असा रेट दिला गेल्याची चर्चा असून पैसे पोहोचल्यानंतरच मतदार बाहेर पडले होते, असे म्हणतात. भाजपाच्या सुरेश धस यांनी मात्र आपण किमान दीडशे मतांनी विजयी होऊ असा दावा केला आहे. तसे झाल्यास पंकजांचे पक्षातील स्थान कायम राहील,पण धनंजय मुंडे यांना राष्ट्रवादीत मोठी मानहानी सहन करावी लागेल, असे दिसते.दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसने गुप्त मतदान पद्धतीचे उल्लंघन केल्याचा आरोप सुरेश धस यांनी केला. राष्ट्रवादीच्या काही उमेदवारांच्या हातात घड्याळ घातले, काहींना किचेन दिल्या, तर काहींच्या शर्टवर चिप्स लावले, असा आरोप धस यांनी केला आहे.  

परभणी- हिंगोलीत काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी असल्याने काँग्रेसचे उमेदवार सुरेश देशमुख यांचे पारडे वरचढ असले, तरी शिवसेनेने अकोल्यातून आयात करून उभे केलेल्या विप्लव बाजोरिया यांनीही मोठ्या प्रमाणात धनवर्षा केल्याने त्यामुळे परभणी-हिंगोलीत शिवसेना व काँग्रेसमध्ये चुरस आहे. भाजपने येथे मात्र  शिवसेनेच्या बाजोरिया यांना मदत करण्याची उघड भूमिका घेतली आहे.  भाजपसह अपक्ष व स्थानिक आघाडीच्या मतदारांना सर्वार्थाने सोबत घेतले असून ही जागा आपणच जिंकू असा दावा सेनेकडून केला जात आहे.