Tue, Jun 18, 2019 23:06होमपेज › Mumbai-Thane-Raigad › भाजप खासदाराने पैसे हिसकावले आणि फाडून भाजीवाल्याच्या अंगावर फेकले

भाजप खासदाराने पैसे हिसकावले आणि फाडून भाजीवाल्याच्या अंगावर फेकले

Published On: May 21 2018 10:46AM | Last Updated: May 21 2018 10:46AMमुलुंड : प्रतिनिधी

ईशान्य मुंबईचे भाजपचे खासदार किरिट सोमय्या यांनी एका भाजीवाल्याच्या हातातील चलनातील नोटा फाडून त्याच्या अंगावर फेकल्याचा धक्कादायक प्रकार रविवारी उघडकीस आला. याबाबत मुलुंडच्या नवघर पोलीस ठाण्यात कलम 427, 506 अंतर्गत अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकाराने घटनास्थळी काहीकाळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. 

मुलुंडच्या इंदिरानगर विभागात राहणारे सचिन मारुती खरात हे मुलुंडमधील राजे संभाजी मैदानाशेजारी भाजी विक्री करीत होते . याचवेळी खासदार किरीट सोमय्या हे राजे संभाजी मैदानात कार्यक्रमासाठी आले होते. काही नागरिकांनी त्यांना मैदानातील काँक्रिटीकरणाबाबत जाब विचारला असता सोमय्या त्या ठिकाणावरून रागातच निघाले. पुढे मैदानाच्या बाजूला काही भाजीवाले, ज्यूस विक्रेते बसले होते. खासदारांनी त्यांना या ठिकाणी धंदा करायचा नाही, असे सांगितले. 

यावेळी भाजीविक्रेते सचिन खरात यांनी आपली भाजी गाडीत भरण्यात सुरवातही केली. त्याचवेळी एका महिलेने भाजीचे पैसे त्यांना देऊ केले असता तेथे उभ्या असलेल्या सोमय्या यांचा राग अनावर झाला. त्यांनी भाजीवाल्याच्या हातातील पैसे ओढून घेत त्याचे तुकडे केले. त्यांना धक्काबुक्की करत तुकडे केलेले पैसे अंगावर फेकून दिले. यानंतर पोलिसांशी संपर्क साधून भाजीवाल्याला बाराशे रुपये दंड भरण्यास लावले. 

> मुलुंड इंदिरानगरात खा. किरिट सोमय्यांनी दमदाटी केलेले भाजीविक्रेते सचिन खरात पोलिसांनी दाखल केलेल्या अदखलपात्र गुन्ह्याची प्रत दाखवताना. या प्रकाराने ते हबकून गेले आहेत.

> सचिन खरात यांना भाजीच्या बदल्यात देण्यात येत असलेल्या 10 आणि 20 रुपयांच्या चलनी नोटा खा. सोमय्यांनी हिसकावून घेत अशा फाडल्या आणि खरात यांच्या अंगावर फेकून दिल्या.

No automatic alt text available.

> या प्रकाराची माहिती संपूर्ण मुलुंड विभागात पसरली असता शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी नवघर पोलीस ठाण्यात धाव घेतली. नवघर पोलिसांकडे सचिन खरात यांनी तक्रार दिली असता पोलिसांनी अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली. सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी या कृत्याबाबत कडक कारवाईच्या मागणीचे निवेदन पोलिसांना दिले. याबाबत खा. किरिट सोमय्या यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता होऊ शकला नाही.

Image may contain: 10 people, people smiling