Sat, Jul 11, 2020 19:24होमपेज › Mumbai-Thane-Raigad › सत्ता स्थापनेच्या तीन अंकी नाटकावर लक्ष, भाजपचा टोला

सत्ता स्थापनेच्या तीन अंकी नाटकावर लक्ष, भाजपचा टोला

Last Updated: Nov 14 2019 10:15PM
मुंबई : पुढारी ऑनलाईन 

सत्ता स्थापनेच्या तीन अंकी नाटकावर लक्ष ठेवून आहे असे म्हणत भाजपचे नेते आशिष शेलार यांनी शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादीला टोला लगावला आहे. भाजपच्या बैठकीनंतर ते पत्रकार परिषदेत बोलत होते. 

शेलार पुढे म्हणाले की, आजच्या बैठकीत भाजपचे विधीमंडळ नेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मार्गदर्शन केले. सत्ता स्थापनेच्या शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी यांच्या बैठकांवर लक्ष ठेवून आहे. अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानी भागाची पाहणी करण्यात येणार आहे. तसेच ९० हजार बूथवर संघटनात्मक निवडणुकाही होणार आहेत, यावर बैठकीत चर्चा झाल्याची माहिती शेलार यांनी यावेळी दिली. 

दरम्यान आज काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांची किमान समान कार्यक्रम ठरवण्यासाठी बैठक पार पडली. हे तिन्ही पक्ष किमान समान कार्यक्रमावर एकत्र येऊन मार्गक्रमण करतील अशी चर्चा आहे. 

तिन्ही पक्ष किमान समान कार्यक्रमाचा मसूदा पक्षश्रेष्ठींना पाठवणार असल्याची माहिती  समन्वय समितीच्या बैठकीनंतर देण्यात आली. बैठक पार पडल्यानंतर काँग्रेसकडून पृथ्वीराज चव्हाण, राष्ट्रवादीकडून जयंत पाटील आणि शिवसेनेकडून एकनाथ शिंदे यांनी माहिती दिली. तिन्ही नेत्यांनी एकमताने किमान समान कार्यक्रमाच्या प्रस्तावावर चर्चा करून तो पक्षश्रेष्ठींना पाठवण्यात येणार असल्याचे सांगितले. किमान समान कार्यक्रमावर तिन्ही पक्षाचे श्रेष्ठी निर्णय घेतील असेही त्यांनी नमूद केले.