होमपेज › Mumbai-Thane-Raigad › भाजपने पालघर राखले!

भाजपने पालघर राखले!

Published On: May 31 2018 1:01PM | Last Updated: Jun 01 2018 1:38AMपालघर/मुंबई : श्रद्धा घरत/चंद्रकांत खुताडे

संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलेल्या पालघर लोकसभा मतदारसंघाच्या अत्यंत चुरशीने झालेल्या पोटनिवडणुकीत अखेर भाजपचे कमळ फुललेे. विशेष म्हणजे या मतदारसंघात पहिल्यांदाच आपले बळ आजमावणारी शिवसेना 29 हजार 572 मतांच्या फरकाने दुसर्‍या क्रमांकावर राहिली तर जिल्ह्यात प्रबळ म्हणून ओळखल्या जाणार्‍या आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीला तिसर्‍या क्रमांकावर समाधान मानावे लागले. माकपनेही लक्षणीय मते घेतली. मात्र या निवडणुकीत काँग्रेसचा पुरता सफाया झाला. काँग्रेसला पाचव्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. पालघर लोकसभा मतदार संघात भाजपने विजय मिळविला असतानाच प्रतिष्ठेची भंडारा-गोंदियाची जागा भाजपला गमवावी लागली. तिथे काँग्रेसने पाठिंबा दिलेला राष्ट्रवादीचा उमेदवार विजयी झाला.

भाजपचे राजेंद्र गावित यांना 2 लाख 72 हजार 782, शिवसेनेचे श्रीनिवास वनगा यांना 2 लाख 43 हजार 210 आणि बविआच्या बळीराम जाधव यांना 2 लाख 22 हजार 838 मते मिळाली. माकपचे किरण गहला यांना तब्बल 71 हजार 887 मते मिळाली. काँग्रेसचे दामू शिंगडा 47 हजार 714 पाचव्या क्रमांकावर राहिले. पोटनिवडणुकीत 16 हजार 884 इतक्या मतदारांनी नोटाला मतदान केले. 

सकाळी आठ वाजता  सूर्या कॉलनी गोडाऊन, पालघर येथे मतमोजणीची पहिली फेरी सुरू झाली. भाजपचे गावित यानी पहिल्या फेरीत 136 मतांची आघाडी घेतली. त्यानंतरच्या प्रत्येक फेरीत गावित यांची कमान चढ़ती राहिली. दहा फेर्‍यापर्यंत गावित व वनगा यांच्यामध्ये चुरशीची लढत होत होती. 15 व्या फेरीनंतर गावित यांची घौड़दौड सुरु झाली ती अखेरपर्यंत कायम राहिली. दुसर्‍या क्रमांकासाठी 21 हजार मतांच्या फरकाने शिवसेनेने बविआला मागे टाकले. पालघरमधे काँग्रेस रसातळाला गेल्याचे चित्र निकालांद्वारे स्पष्ट होत आहे.

भाजपने या पोटनिवडणुकीसाठी आपली सारी ताकद पणाला लावली होती. श्रमजीवीचे अध्यक्ष विवेक पंडित यांचा पाठिंबा, मुख्यमंत्र्यांचे पालघर दौरे, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आदित्यनाथ योगी यांची पालघर भेट व इतर सर्वच गोष्टी भाजपच्या विजयाला हातभार लावण्यास उपयोगी ठरल्या. या निवडणुकीत बविआ आणि काँग्रेस स्वतंत्रपणे लढले होते. त्याचा बविआला फटका बसल्याचे दिसून आले. शिवाय पहिल्या दोन क्रमांकावर असलेल्या भाजप आणि शिवसेना या दोन्ही पक्षांनी दुसर्‍या पक्षातून आलेल्या उमेदवारांना तिकिटे दिली होती. भाजपचे विजयी उमेदवार राजेंद्र गावित हे काँग्रेसमधून भाजपात आले होते तर श्रीनिवास वनगा हे भाजपमधून सेनेत दाखल झाले होते. 

लक्षणीय नोटा

कुठल्याही अकार्यक्षम उमेदवाराला मत देण्यापेक्षा नोटाला मत द्या, असे आवाहन अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी केले होते.त्यानुसार नोटावर  16884 मतदारांनी मतदान केले.

प्रशासनाचा सावळा गोंधळ

मतदानाच्या दिवशीप्रमाणेच मोजणीच्या दिवशीही प्रशासनाने गोंधळाचे दर्शन घडवले. मतमोजणीला सुरुवात होऊन दुसरी फेरी होऊन गेली तरी देखील प्रशासनाकडून प्रसिद्धीमाध्यमांना निकाल कळवण्यात आला नव्हता. मतमोजणीची दहावी फेरी सुरू झाली तरी सहाव्या फेरीचा निकाल देण्यात आला होता. स्पीकरची व्यवस्थाही करण्यात आली नव्हती. पत्रकारांनी मागणी केल्यावर ती व्यवस्था पुरवण्यात आली.

प्रस्थापित आमदारांसाठी धोक्याची घंटा

पालघर लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघ येत असून त्यातील वसई, नालासोपारा आणि बोईसर या तीन मतदारसंघात बविआचे आमदार आहेत. मात्र बविआला वसई आणि नालासोपारा या दोन मतदारसंघातच आघाडी घेतला आली. बोईसर मतदारसंघात शिवसेनेने बविआला तीन हजार मतांनी पिछाडीवर टाकले. पालघर विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचा विद्यमान आमदार असून, या मतदारसंघात भाजपने सेनेला 1800 मतांनी पिछाडीवर टाकले. डहाणून आणि विक्रमगड या दोन विधानसभा मतदारसंघात भाजपचे आमदार असून, या दोन्ही मतदारसंघात भाजपला आघाडी मिळाली. 

पत्रकारांशी शाब्दिक बाचाबाची

वेळेवर माहिती पुरवत नसल्याने पत्रकार व जिल्हा प्रशासन यामध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. काही माध्यमांच्या प्रतिनिधींना मतमोजणीच्या मधल्या भागात प्रवेश हवा होता.परंतु प्रवेश दिला जात नसल्याने पत्रकारांनी प्रशासनाने दिलेला प्रवेश पास फाडून जिल्हा प्रशासन हाय हाय आशा घोषणा देऊन निषेध व्यक्त केला. एका वृत्तवहिनीच्या कॅमेरामनने मध्ये प्रवेश केल्यामुळे पोलिसांनी त्याला मध्येच अडवून बाहेर पडण्यास बंदी घातली. तासाभराने काही पत्रकारांना हा प्रकार समजल्यावर त्यांची पोलिसांसोबत शाब्दिक बाचाबाची झाली व त्याला सोडण्यात आले. पालघरचे तहसीलदार महेश सागर यांच्याशीही वाहिनीच्या प्रतिनिधीची बाचाबाची झाली.